जलशुद्धीकरण योजना रखडली
By Admin | Updated: January 13, 2016 02:47 IST2016-01-13T02:47:06+5:302016-01-13T02:47:06+5:30
राष्ट्रीय पेय जलयोजनेंतर्गत २००८-०९ मध्ये मंजूर जलशुद्धीकरण योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. यामुळे पवनारकरांना शुद्ध पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.

जलशुद्धीकरण योजना रखडली
सहा वर्षांपासून योजना रखडली : पाईपलाईनचे काम खासगी प्लॉटमधून
पवनार : राष्ट्रीय पेय जलयोजनेंतर्गत २००८-०९ मध्ये मंजूर जलशुद्धीकरण योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. यामुळे पवनारकरांना शुद्ध पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. येथील नागरिकांना आणखी किती दिवस शुद्ध पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार, असा संतप्त सवाल, उपस्थित केला जात आहे.
येथे १ कोटी ८३ लाख रुपयांची योजना कित्येक दिवसांपासून शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. विहीर, टाकी व जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याचे दिसून येते; पण पाणी पुरवठ्याची गावातील जुनी लाईन खराब झाली आहे. यामुळे नवीन पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे. या कामास विलंब होत असल्याचे कंत्राटदाराने सांगितले. पाईपलाईनचा नकाशा तपासला असता नवीन ले-आऊटमधील प्लॉट धारकांच्या जागेत असल्याचे निदर्शनात आले. यामुळे सरपंच गांडोळे यांनी सदर प्लॉटमधून गेलेली पाईपलाईन काढून नवीन योग्य ठिकाणाहून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्यक्षात पाईपलाईन नकाशा मंजूर करताना या बाबी लक्षात घेणे गरजेचे होते; पण तत्कालीन प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. या प्रकारामुळे योजनेच्या पूर्णत्वास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. शिवाय कामही अत्यंत संथगतीने सुरू आहे. योजनेचे काम असेच सुरू राहिल्यास आणखी एक वर्ष नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार नाही, अशीच शक्यता वर्तविली जात आहे.
सध्या येथे कार्यरत जल शुद्धीकरण केंद्र हे क्षमतेने लहान असून यंत्राचीही कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी, नागरिकांना पुर्णत: शुद्ध पाणी मिळत नाही. पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी, ब्लिचिंग व वीज बिलाचा अतिरिक्त भार ग्रामपंचायत प्रशासनाला सहन करावा लागत आहे. नवीन जलशुद्धीकरण केंद्र लवकर सुरू झाल्यास मोठी बचत होऊ शकते. सध्या नागरिकांना विंधन विहिरीवरून पिण्याचे पाणी घ्यावे लागत आहे. विंधन विहिरीच्या पाण्याचे नमूने तपासले असता टीडीएस ५०० च्या वर असल्याचे समोर आले आहे. यावरून विंधन विहिरीचे पाणी शुद्ध असले तरी पिण्यास अपायकारक असल्याचे सिद्ध होते. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(वार्ताहर)