जलशुद्धीकरण केंद्रच पडले आजारी
By Admin | Updated: May 12, 2017 00:54 IST2017-05-12T00:54:28+5:302017-05-12T00:54:28+5:30
चार गावांसाठी तयार करण्यात आलेली द्रुगवाडा नळयोजना व जलशुद्धीकरण केंद्र सध्या आजारी पडले आहे.

जलशुद्धीकरण केंद्रच पडले आजारी
चार गावांच्या पाणी पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह : द्रुगवाडा ग्रामस्थांनी नाकारले पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : चार गावांसाठी तयार करण्यात आलेली द्रुगवाडा नळयोजना व जलशुद्धीकरण केंद्र सध्या आजारी पडले आहे. पाण्याचे शुद्धीकरण तर दूरच येथील साफसफाईदेखील होत नाही. यातच द्रुगवाडा येथील ग्रामस्थांनी पाणी नाकारले असून ते खासगी विहीर अधिग्रहित करून तहान भागवित आहे. याला नियोजनाचा अभाव कारणीभूत ठरत आहे. यात पाणी पुरवठा विभागाने सुधारणा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
द्रुगवाडा, साहूर, सावंगा (पुनर्वसन) व धाडी या चार गावांसाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. वर्धा नदीत बारमाही पाणी वाहत असल्याने या ठिकाणी केंद्र उभारण्यात आले. या केंद्रातून प्रारंभी चांगली सेवा मिळाली. काळ बदलत गेला. संपूर्ण व्यवस्था कोलमडत गेली. या ठिकाणी ब्लिचींग पावडर नाही, केंद्र तीन महिन्यांपासून बंद आहे. सभोवताल घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मोकाट जनावरांचा कळप, गावठी वराह आणि कुत्रे हे पाण्यात बसत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे खरोखरच नागरिक हे पाणी पिणार काय, हा प्रश्नच आहे. गॅस्ट्रोची लागण हे सर्वकाही सांगून जात आहे. द्रुगवाडा ग्रा.पं. च्या सभेत यावर चर्चा झाली. या नळ योजनेचे पाणी पिणार नाही, असा निर्धार करून त्वरित नवीन व्यवस्था उभी करण्यात आली. दुसऱ्या खासगी विहिरीमधून गावकऱ्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
साहूर, सावंगा (पुनर्वसन), धाडी या तीन गावांना याच ठिकाणाहून पाणी येत आहे. वर्धा नदीच्या पात्रातील पाणी थेट पिण्यासाठी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जलशुद्धीकरण केंद्र तीन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना दूषित व गढुळ पाणी प्यावे लागत आहे. साहूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत राऊत यांनी भेट देत पाहणी केली. यात अस्वच्छतेचा कळस दिसून आला. शासनाचे धोरण चांगले आहे; पण अंमलबजावणी करणारी यंत्रणा कुचकामी असल्याने ग्रामस्थांना आजारांचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देत शुद्ध पाणी पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.