निम्न वर्धाच्या कालव्यातून पाण्याचा पाझर
By Admin | Updated: February 4, 2015 23:21 IST2015-02-04T23:21:25+5:302015-02-04T23:21:25+5:30
निम्न वर्धा प्रकल्पाचा मायनर कालवा सेक्शन नंबर सहा यातून पाणी पाझरते. नजीकच्या सायखेडा मौजातील शेतकऱ्यांना यामुळे नुकसान सोसावे लागत आहे. या कालव्याच्या निकृष्ट

निम्न वर्धाच्या कालव्यातून पाण्याचा पाझर
रोहणा : निम्न वर्धा प्रकल्पाचा मायनर कालवा सेक्शन नंबर सहा यातून पाणी पाझरते. नजीकच्या सायखेडा मौजातील शेतकऱ्यांना यामुळे नुकसान सोसावे लागत आहे. या कालव्याच्या निकृष्ट बांधकामामुळे तसेच बऱ्याच वर्र्षांपासून कोणतीचे दुरुस्ती न झाल्यामुळे हा कालवा अनेक ठिकाणी पाझरतो. या कालव्यातील पाणी लगतच्या शेतात जमा होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे.
हा पाझर सतत सुरू असल्याने काही भागात दलदल तयार झाली आहे. तर पाझर काही ठिकाणी बुजल्याने पाणी सरळ न वाहता लगतच्या शेतात पसरते. परिणामी कालवा परिसरातील शेतात दलदल निर्माण झाली आहे. यामुळे शेकडो एकर शेतातील पिकांचे नुकसान होवून शेतकऱ्यांना दरवर्षी लाखोंचा फटका सहन करावा लागत आहे. पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने समस्या कायम आहे.
सायखेडा शिवारातून लोअर वर्धा प्रकल्पाचा मायनर कालवा सेक्शन नंबर ६ गेला आहे. या कालव्याच्या बाजूला अरुण बोबडे, सुभाष डाखोरे, रमेश ठाकरे, माजी सरपंच सुनीता बोबडे, वसंत बोबडे, निरंजन बोबडे, धर्मराज डाखोरे, सुरेश ठाकरे, शालीक ठाकरे, धनराज कैलुके, भाष्कर ठाकरे, गजानन डाखोरे यांची शंभर एकरच्या जवळपास जमीन आहे. सदर मायनर कालव्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याने तो सुरुवातीपासूनच अनेक ठिकाणी पाझरत होता. हा पाझर अद्याप कायम आहे. आतातर त्या कालव्यात अनेक ठिकाणी माती साचून कालवा बुजत आहे. कालव्यातून सिंचनासाठी सोडलेले पाणी सरळ वाहत न जाता परिसरातील शेतात पाझरते. जेथे कालवा बुजला तेथून पाणी प्रवाह बदलून अनेकांच्या शेतातून पाट वाहतात. परिणामी शेतात दलदल तयार होवनू पिकांना नुकसान होते. एवढेच नव्हे तर हजारोलिटर पाणी यामुळे वाया जात आहे. सदर बाब पिडीत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागातील अधिकऱ्यांना भेटून व लेखी निवेदनाद्वारे लक्षात अनेकदा आणून दिली. मात्र यावर कार्यवाही झाली नाही. कधी निधी नाही तर निवडणूक आचार संहिता असे कारणे पुढे करीत असल्याने प्रश्न कायम आहे.(वार्ताहर)