पाणी, विजेची काटकसर म्हणजे भविष्याची गुंतवणूक!
By Admin | Updated: October 29, 2014 22:53 IST2014-10-29T22:53:36+5:302014-10-29T22:53:36+5:30
नैसर्गिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करून ऊर्जेची निर्मिती केली जाते. मानवी जीवन गतिमान करण्यात वीज महत्त्वपूर्ण आहे. शिवाय जलस्त्रोतही निसर्गत: उपलब्ध असल्याने मानवी जीवन अधिक सुकर झाले

पाणी, विजेची काटकसर म्हणजे भविष्याची गुंतवणूक!
श्रेया केने - वर्धा
नैसर्गिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करून ऊर्जेची निर्मिती केली जाते. मानवी जीवन गतिमान करण्यात वीज महत्त्वपूर्ण आहे. शिवाय जलस्त्रोतही निसर्गत: उपलब्ध असल्याने मानवी जीवन अधिक सुकर झाले असले तरी या नैसर्गिक स्त्रोतांचा होणारा उपसा आणि अपव्यय पाहता हे स्त्रोत संपण्याच्या वाटेवर आहेत़ ही समस्या जागतिक पातळीवर असली तरी स्थानिक पातळीवर काटकसर, अपव्यय टाळला तर ‘थेंबे-थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे मोठ्या प्रमाणात या स्त्रोतांचे होणारे दोहण वाचविता येईल. शासकीय स्तरावर जागृती अभियानातून वीज, पाणी बचतीचे संदेश दिले जात असले तरी प्रत्यक्ष कृती नसल्याचे निदर्शनास येत असल्याची बाब संबंधितांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. काटकसर दिनानिमित्त नैसर्गिक स्त्रोतांचा हा अल्पसा आढावा़़़
एक युनिटची बचत म्हणजे एक युनिट निर्मिती
प्रत्येक ग्राहकाने दिवसाला जर युनिटची वीज बचत केली तर दिवसाला एक युनिटची निर्मिती केल्यासारखे होईल. नियमित वीजवापर करताना बरेचदा घरगुती उपकरणे, पथदिवे सुरू राहिल्याने मोठ्या प्रमाणात विजेचा अपव्यय होतो. हा अपव्यय थांबविणे म्हणजेच विजेची बचत करणे होय.
विजेचा वापर आवश्यक प्रमाणात झाला पाहिजे; पण गरज नसताना विजेचे दिवे, उपकरणे चालू ठेवणे हा प्रकार विजेच्या अपव्ययात मोडतो.
नागरिकांनी सजगता दाखवून हा अपव्यय टाळल्यास मोठ्या प्रमाणात वीज बचत होऊ शकते. यासाठी काटकसर करण्याची गरज नाही, अशी माहिती अधीक्षक अभियंता कांबळे यांनी ‘लोकमत’ सोबत बोलताना दिली.
एक युनिटची वीज निर्मिती करण्यास लागणारा खर्च आणि घरगुती वापरावर आकारण्यात येणारे युनिटचे दर यात तफावत आहे. एक युनिट वीज वाचविल्यास एक युनिटची निर्मिती होऊ शकते. यामुळे विजेच्या तुटवड्याचे संकट टळेल.