‘वॉश आऊट’ मोहीम पुढे पाठ मागे सपाट
By Admin | Updated: September 26, 2015 02:09 IST2015-09-26T02:09:10+5:302015-09-26T02:09:10+5:30
गावठी दारू नष्ट करण्याकरिता गृह विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात येत आहे.

‘वॉश आऊट’ मोहीम पुढे पाठ मागे सपाट
नऊ महिन्यात ४७ कारवाया : ८२.६० लाख रुपयांचा मोहा सडवा व साहित्य नष्ट
वर्धा : गावठी दारू नष्ट करण्याकरिता गृह विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहर पोलसांनी गावठी दारूच्या भट्ट्या असलेल्या आनंदनगर, इतवारा, पुलफैल या भागात तब्बल ४७ वेळा कारवाई केली. प्रत्येक मोहिमेत लाखोंचा मुद्देमाल नष्ट केल्याचे समोर येत असले तरी येथे भट्ट्या सुरूच आहेत. पोलीस पाठमोरे होताच येथे पुन्हा गावठी दारू गाळण्याकरिता भट्ट्या सुरू होतात. यामुळे पोलिसांची ही ‘वॉश आऊट’ मोहीम पुढे पाठ मागे सपाट ठरत असल्याचे समोर येत आहे.
शासनाच्या आदेशानुसार वॉश आऊट मोहीम मे २०१५ पासून राबविण्यात आली. वर्धा पोलिसांद्वारे ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. असे असतानाही त्यांच्या कारवाईचा या दारूविक्रेत्यांवर कुठलाही परिणाम होत नसल्याचे दिसून येते. याला पोलीस विभागातील काही कर्मचारीच या दारू विक्रेत्यांचे खबरे झाल्याचे समोर आले आहे. याचा त्रास काही कर्तव्यदक्ष पोलिसांनाही झाला आहे. काहींवर मारही खाण्याची वेळ आली.
९३ जणांना प्रतिबंधात्मक नोटीस
शहरातील या भागात गावठी दारू गाळल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्यांपैकी एकूण ९३ जणांना हा व्यवसाय करण्यास प्रतिबंध घालत असल्याची नोटीसही पोलीस विभागाच्यावतीने बजावण्यात आली आहे. असे असतानाही ते बिनदिक्कत व्यवसाय करीत आहे. त्यांना वारंवार अटक करण्यात येते, मात्र न्यायालयातून जामीन घेत ते पुन्हा हाच व्यवसाय करीत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. यामुळे यावर काय मार्ग काढावा यासंदर्भात शासनाने सूचना कराव्या असे पोलीस विभाग म्हणत आहे.
अटकेचे प्रमाण कमी
वर्धा पोलिसांच्यावतीने मे २०१५ मध्ये वॉश आऊट मोहीम राबविण्यात आली. या माहिेमेत दारू गाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. यात त्यांना अटक होत नसल्याने त्यांच्याकडून पुन्हा तोच व्यवसाय सुरू होत असल्याचे समोर आले आहे.