कर्जाचा भरणा करूनही जप्तीचा वारंट
By Admin | Updated: January 11, 2016 02:01 IST2016-01-11T02:01:35+5:302016-01-11T02:01:35+5:30
बँकेच्या कर्जाचा भरणा करूनही संबंधितावर जप्तीचा वारंट बजावला. तसेच लोक न्यायालयात हजर राहण्याचे फर्मान काढण्याचा प्रताप येथील स्टेट बँकेने केला.

कर्जाचा भरणा करूनही जप्तीचा वारंट
ग्राहकाला मनस्ताप : स्टेट बँकेचा प्रताप
देवळी : बँकेच्या कर्जाचा भरणा करूनही संबंधितावर जप्तीचा वारंट बजावला. तसेच लोक न्यायालयात हजर राहण्याचे फर्मान काढण्याचा प्रताप येथील स्टेट बँकेने केला. यामुळे बँक व्यवस्थापनाने मानसिक छळ केल्याचा आरोप सदर शेतकऱ्याने केला आहे. शाखा प्रबंधकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
नजीकच्या ईसापूर येथील अनिल नामदेव निखाडे या सुशिक्षित बेरोजगाराने व्यवसायासाठी देवळीच्या स्टेट बँक शाखेतून ६१ हजाराचे कर्ज घेतले. कर्जाच्या रकमेतून त्याने पेप्सी बनविण्याचा लघुउद्योग सुरू केला. या दरम्यान ग्रामीण भागातील सततचे भारनियमन व इतर कारणांमुळे हा व्यवसाय अल्पावधीत बंद पडला. उत्पन्नाचे साधनच बंद पडल्यामुळे बँकेच्या कर्जाचे हप्ते कसे भरावे ही विवंचना होती. अनिलने यादरम्यान बँक अधिकाऱ्यांना भेटून स्वत:ची आर्थिक बाजू सांगितली. बँकेने सुद्धा सहमती दर्शवून अनिल सोबत आपसी समझोता केला. कर्ज स्वरूपात उचलेल्या ६१ हजाराचे ७० हजार रुपये दोन टप्प्यात देण्याचे ठरले. पहिल्या टप्प्यातील ३५ हजार २१ फेब्रुवारी २०१२ रोजी व उर्वरित ३५ हजाराचा भरणा १९ मार्च २०१२ रोजी केला.
बँक अधिकाऱ्यांच्या लिखित समझोत्यानुसार हा व्यवहार करण्यात आला. पण काही कालावधीतच पुन्हा पैसे भरण्याचा तगादा बँकेकडून लावण्यात आला. जप्तीची नोटीस बजावून लोकन्यायालयात हजर राहण्याचे फर्मानही काढण्यात आले. त्यामुळे बँकेच्या अव्यवस्थेबाबत निखाडे याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वरिष्ठांनी संबंधितास समज देण्याची मागणी होत आहे.