सावधान:कोरोना रुग्ण संख्येत जिल्हा १,६०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:00:07+5:30

ऑगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात दशम संख्येत कोविड बाधित प्रत्येक दिवशी आढळले पण सप्टेंबर महिना सुरू होताच प्रत्येक दिवशी (काही अपवाद वगळता) शतक संख्येत कोविड बाधितांनी नोंद होत आहे. याला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कोविड चाचण्या कारणीभूत असल्याचे सांगितले जात असले तरी ही वर्धेकरांसाठी धोक्याचीच घंटा आहे.

Warning: The number of corona patients in the district has crossed 1,600 | सावधान:कोरोना रुग्ण संख्येत जिल्हा १,६०० पार

सावधान:कोरोना रुग्ण संख्येत जिल्हा १,६०० पार

ठळक मुद्दे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण वाढताहेत । बिनधास्त राहिल्यास गमवावा लागेल जीव

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुरूवातीला अतिशय तुरळक प्रमाणात कोविड बाधित जिल्ह्यात मिळाले. पण गत दोन महिन्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली. अशातच सध्या वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १,६०२ कोविड बाधितांची नोंद झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णही झपाट्याने वाढत आहेत. अशातच नागरिकांनी गाफिल राहिल्यास त्यांना वेळप्रसंगी आपले प्राण गमवावे लागणार आहे. परिणामी, प्रत्येक व्यक्तीने जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचेच आहे.
मार्च महिन्यात अखेरीस कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पण मार्च आणि एप्रिल महिन्यात वर्धा जिल्ह्यात एकाही कोरोना बाधिताची नोंद घेण्यात आली नव्हती. तर मे महिन्यात १९, जून महिन्यात १६, जुलै महिन्यात २२५ तर ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजे १,००९ कोविड बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात दशम संख्येत कोविड बाधित प्रत्येक दिवशी आढळले पण सप्टेंबर महिना सुरू होताच प्रत्येक दिवशी (काही अपवाद वगळता) शतक संख्येत कोविड बाधितांनी नोंद होत आहे. याला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कोविड चाचण्या कारणीभूत असल्याचे सांगितले जात असले तरी ही वर्धेकरांसाठी धोक्याचीच घंटा आहे. प्रत्येक दिवशी कधी शंभर तर कशी दीडशे कोविड बाधित आढळून येत असले तरी बेफिकीर वर्धेकर सध्या कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाबाबत गाफिल असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्यासह मास्कचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

६८५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, दोन रुग्णालयांत होताय उपचार
कोरोनाचे निदान झाले पण कोविडचे लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृहअलगीकरणात ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने घेतला आहे. असे असले तरी सध्या जिल्ह्यात ६८५ अ‍ॅक्टिव्ह कोरोना बाधित आहे. शिवाय त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत कोविड रुग्णालयांवर कोविड बाधितांचा चांगली आरोग्य सेवा देण्याचा ताण वाढत आहे. सध्या जिल्ह्यात रुग्ण खाटा मर्यादीत असून झपाट्याने कोरोनाची रुग्ण वाढल्यास आरोग्य विभागाची तारांबळच उडणार आहे. अशात अनेक कोविड बाधितांचा उपचाराअभावी मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या प्रत्येक सूचनेचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

३१ व्यक्तींचा कोविडने घेतला बळी
आतापर्यंत कोरोनाने ३१ व्यक्तींचा बळी घेतल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. असे असले तरी यापैकी एका व्यक्तीचा इतर आजाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. दिवसेंदिवस कोविड मृतकांची संख्या वाढत आहे. परिणामी, मृत्यू दर नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

सहा लोकप्रतिनिधींसह दोन अधिकाऱ्यांना बाधा
कोरोनाचा संसर्ग कुणालाही होऊ शकतो. सहा लोकप्रतिनिधींना तसेच दोन अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात पालकमंत्र्यांसह वर्धेचे आमदार, आर्वी आणि हिंगणघाट येथील नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेचे दोन सदस्य आणि उपजिल्हाधिकारी तसेच कारंजा येथील गटविकास अधिकाºयांचा समावेश आहे.

कोरोना विषाणू जीवघेणा असला तरी खबरदारी हा प्रभावी उपाय आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत:च घेतली पाहिजे. शिवाय लक्षणे आढळल्यास त्वरीत नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्याने कोविड चाचणी करून घेत औषधोपचार घ्यावे. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्रत्येक सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

Web Title: Warning: The number of corona patients in the district has crossed 1,600

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.