पुलाकरिता झाडगाववासीयांनी दिला आंदोलनाचा इशारा
By Admin | Updated: July 29, 2016 02:08 IST2016-07-29T02:08:40+5:302016-07-29T02:08:40+5:30
आदिवासीबहुल गाव असलेल्या आष्टी तालुक्यातील झाडगाव येथील नाल्यावरील पूल खचल्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे.

पुलाकरिता झाडगाववासीयांनी दिला आंदोलनाचा इशारा
मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आष्टीच्या राज्यमार्गावर सत्याग्रह
साहूर : आदिवासीबहुल गाव असलेल्या आष्टी तालुक्यातील झाडगाव येथील नाल्यावरील पूल खचल्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेकवार तक्रारी करूनही बांधकाम विभागाने या तुटलेल्या पुलाची दुरूस्ती केली नाही. यामुळे गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. १४ आॅगस्टपर्यंत खचलेला पुलाची दुरूस्ती झाली नाही तर मानव जोडो संघटनेच्या नेतृत्वात आष्टीच्या राज्यमार्गावर सत्याग्रह करण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांनी कळविले आहे.
टुमनी, बोरगाव, वर्धपूर, वडाळा, सत्तरपूर येथील गाकवऱ्यांना शासकीय कामासाठी दररोज आष्टी येथे यावे लागते. अर्धवट असलेल्या या पुलामुळे झाडगावच्या मुलांना आष्टीच्या शाळांमध्ये वेळेवर येता येत नाही. एसटी महामंडळाची बस रस्ता वाहून गेल्याने गावात येत नाही. संपूर्ण पहाडी भागातून जमा झालेले पाणी या नाल्यात आल्यामुळे नाल्यावरील पुल खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची खचलेल्या भागात दुरूस्ती व पुलाला कोटींग केल्यास वाहतूक सुरू होऊ शकते.
आंदोलनाच्या इशाऱ्याच्या प्रतिलिपी मानव जोडो संघटनेद्वारा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी, खासदार, आमदारांसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती किसना अरसड, बबन दंडाळे, दादाराव धुर्वे, कैलास घाटोळे, गजानन काटे, जनार्दन मानकर, सुभाष कोसरे, विजय घारवाडे, नागोराव शेंद्रे, अंकुश चामलाटे, प्रभाकर घारवाडो, पुरूषोत्तम वरठी, माणिक घाटवाडे, मारोती शेंद्रे यांच्यासह गावकऱ्यांनी दिली.(वार्ताहर)