वर्धेकरांनो, सावधान! कोरोना संक्रमणात वर्धा तालुका पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST2021-02-15T05:00:00+5:302021-02-15T05:00:12+5:30
मागील १३ दिवसांत जिल्ह्यात ६ हजार ८७५ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून, वर्धा तालुक्यात मागील १३ दिवसांत ३४७, आर्वी तालुक्यात २३, आष्टी तालुक्यात १०, कारंजा तालुक्यात ५०, हिंगणघाट तालुक्यात ११३, समुद्रपूर तालुक्यात तीन, देवळी तालुक्यात ११, तर सेलू तालुक्यात १६ नवीन कोविडबाधित सापडले आहेत.

वर्धेकरांनो, सावधान! कोरोना संक्रमणात वर्धा तालुका पुढे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील १३ दिवसांत जिल्ह्यात तब्बल ५७३ नवीन कोविडबाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची सध्या आता १० हजार ६६२ झाली आहे. असे असले तरी नवीन कोविड बाधितांपैकी ३४७ रुग्ण हे एकट्या वर्धा तालुक्यातील असल्याने वर्धा तालुक्यात कोरोना संक्रमणाची गती इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. दिवसेंदिवस कोविडबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनीही आता अधिक दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकारपणे पालन करणे गरजेचे आहे.
प्राप्त माहितीनुसार, मागील १३ दिवसांत जिल्ह्यात ६ हजार ८७५ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून, वर्धा तालुक्यात मागील १३ दिवसांत ३४७, आर्वी तालुक्यात २३, आष्टी तालुक्यात १०, कारंजा तालुक्यात ५०, हिंगणघाट तालुक्यात ११३, समुद्रपूर तालुक्यात तीन, देवळी तालुक्यात ११, तर सेलू तालुक्यात १६ नवीन कोविडबाधित सापडले आहेत. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली आहे. कोरोना संकटाच्या काळात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे हे फायद्याचे ठरत असले तरी जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरात आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाच्या सूचनांना बगल दिली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. हिंगणघाट तालुक्यातील एका निवासी वसतिगृहात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हिंगणघाट तालुक्यातील सर्वच शाळा २० फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोनाची लस आली असली तरी कोरोनाचे संकट अजूनही कायम असल्याने सध्याच्या कोरोनात प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. शिवाय तसे आवाहनही करण्यात येत आहे.
कोरोनामुळे तब्बल १३ व्यक्तींचा झाला मृत्यू
मागील १३ दिवसांत ४७२ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला असला तरी सहा पुरुष आणि सात महिला असे एकूण १३ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना मृतकांच्या संख्येत वाढ होत असल्याने गाफील राहणाऱ्या वर्धावासीयांनी आता दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची नितांत गरजेचे आहे.
४७२ रुग्णांचा कोविडवर विजय
मागील १३ दिवसांत जिल्ह्यात तब्बल ५७३ नवीन कोविड बाधित सापडले असले तरी याच कालावधीत ४७२ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.