निर्मलग्राम अभियानात वर्धेची राज्यात आघाडी
By Admin | Updated: July 17, 2014 00:14 IST2014-07-17T00:14:55+5:302014-07-17T00:14:55+5:30
निर्मल भारत अभियानांतर्गत ‘प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय’ या अभिनव कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने मागील दोन वर्षांपासून राज्यस्तरावर दिलेले उद्दीष्ट पूर्ण केले आहे़ जिल्ह्यात २८ हजार ९२५ शौचालयांचे

निर्मलग्राम अभियानात वर्धेची राज्यात आघाडी
कारंजा अव्वल : ६० पैकी ५७ गावे निर्मल
वर्धा : निर्मल भारत अभियानांतर्गत ‘प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय’ या अभिनव कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने मागील दोन वर्षांपासून राज्यस्तरावर दिलेले उद्दीष्ट पूर्ण केले आहे़ जिल्ह्यात २८ हजार ९२५ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे़ संपूर्ण कारंजा तालुका निर्मल झाल्यानंतर मार्च अखेरपर्यंत संपूर्ण जिल्हा निर्मल करण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे.
निर्मल भारत अभियानांतर्गत वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जिल्ह्यात सुरू आहे. बेसलाईन सर्वेक्षणानुसार ९५ हजार कुटुंब आहे़ प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी निर्मल भारत अभियान व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमांतर्गत शौचालय बांधकामासाठी १० हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येते. यात निर्मल भारत अभियानांतर्गत ४ हजार ५०० तर मनरेगातर्फे ६ हजार ५०० रुपयांच्या निधीचा समावेश आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांना जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी प्रत्येक तालुक्यात सरपंच तसेच ग्रामसेवकांना प्रवृत्त करून शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन देऊन संपूर्ण वर्धा जिल्हा निर्मल जिल्हा करण्याचा संकल्प केला़
जिल्ह्यात २८ हजार ९२५ शौचालये बांधून झाले असून शासनाच्या १६ हजार ७१ उद्दीष्टापेक्षा अधिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले़ यावर्षी जून अखेरपर्यंत १० हजार ३९९ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले़ ५ हजार ७२६ शौचालये प्रगतीपथावर आहे. मार्च अखेरपर्यंत १८ हजार ५२६ शौचालय बांधून पूर्ण झाले आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)
कारंजा पंचायत समितीची आघाडी
कारंजा पंचायत समिती अंतर्गत ६० गावांचा समावेश असून मागील वर्षी ३१ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी २६ ग्रामपंचायती पुरस्कारासाठी सज्ज आहेत. निर्मलग्राम ही संकल्पना जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबांनी राबवावी, यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने जनजागृतीचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला़ यामुळे निर्मलग्रामचे उद्दीष्ट साध्य होईल, असा विश्वास मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केला़ कारंजा पंचायत समितीला ८ हजार ३६१ शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट आहे़ पैकी ५ हजार ४३३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे तर ७०० शौचालय प्रगतिपथावर आहेत.