वॉकेथॉनमध्ये शाळकरी मुलांसह वर्धेकरांचा सहभाग
By Admin | Updated: January 11, 2015 23:03 IST2015-01-11T23:03:04+5:302015-01-11T23:03:04+5:30
रस्ता सुरक्षा अभियानाला रविवारपासून प्रारंभ झाला. या अभियानांतर्गत वर्धेत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळकरी मुलांसह वर्धेकरांनी सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी

वॉकेथॉनमध्ये शाळकरी मुलांसह वर्धेकरांचा सहभाग
वर्धा : रस्ता सुरक्षा अभियानाला रविवारपासून प्रारंभ झाला. या अभियानांतर्गत वर्धेत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळकरी मुलांसह वर्धेकरांनी सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांच्या हस्ते वॉकेथॉनला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या पंधरवड्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. वॉकेथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी शहर दूमदूमून गेले. ‘स्कूल बस आपल्या पाल्यासाठी सुरक्षित, येईल जेव्हा शाळा अतिवेग टाळा... मत चलाओ मत चलाओ पीके गाडी मत चलाओ, चलाओ चलाओ सायकल चलाओ, वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा, प्रदुषण टाळा आरोग्य सांभाळा’ आदी घोषणा देण्यात आल्या.
क्रीडा संकुलावरून निघालेली रॅली इतवारा चौक, बजाज चौक, सोशालिस्ट चौक, शिवाजी चौक, जेल रोड येथून क्रीडा संकुलावर पाहोचली असता रॅलीची सांगता झाली. उद्घाटनाला एसडीओ वैभव नावडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास मांजरीकर, सहायक उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत झाडे, मोटार वाहन निरीक्षक डी.झेड. राठोड, अहमद अश्फाक, वेनूगोपाल शेंडे, सहायक मोटार वाहन निरीक्षक संजय पाटील उपस्थित होते.(प्रतिनिधी)