वर्धा, सेवाग्राम रेल्वे स्टेशनमध्ये मूलभूत सुविधा पुरविणार
By Admin | Updated: November 26, 2014 23:11 IST2014-11-26T23:11:17+5:302014-11-26T23:11:17+5:30
सेवाग्राम व वर्धा रेल्वे स्थानकावर निर्माण झालेल्या समस्या सोडवाव्या व न थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांचे थांबे देण्यात यावे, या मागणीसाठी खासदार रामदास तडस व आमदार पंकज भोयर यांनी रेल्वे प्रबंधकांशी

वर्धा, सेवाग्राम रेल्वे स्टेशनमध्ये मूलभूत सुविधा पुरविणार
वर्धा : सेवाग्राम व वर्धा रेल्वे स्थानकावर निर्माण झालेल्या समस्या सोडवाव्या व न थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांचे थांबे देण्यात यावे, या मागणीसाठी खासदार रामदास तडस व आमदार पंकज भोयर यांनी रेल्वे प्रबंधकांशी चर्चा केली. यावेळी रेल्वे प्रवाशांच्या समस्या त्वरित सोडविण्यात याव्या व रखडलेली कामे पूर्ण करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली. रेल्वे प्रबंधकांनीही वर्धा व सेवाग्राम रेल्वे स्थानकावर मुलभूत सुविधा त्वरित उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही दिली़
खासदार तडस व आमदार भोयर यांनी विभागीय रेल्वे प्रबंधकांना मागण्याचे निवेदन सादर करीत चर्चा केली़ यात मालधक्का फलाट क्र. १ वर त्वरित फलाट निर्मितीचे कार्य करावे, सेवाग्राम स्टेशन व देवळी रोडवरील वर्धा स्टेशनची आरक्षण खिडकी सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवावी, रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, वर्धा व सेवाग्राम रेल्वेस्थानक परिसरातून जाणाऱ्या ६२ गाड्यांना अद्याप थांबा देण्यात आला नाही, यातील महत्त्वपूर्ण गाड्यांचा थांबा द्यावा, प्रतिक्षालय परिसरात मुत्रीघर, स्नानगृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, उच्च श्रेणी प्रतिक्षालयात एसीची व्यवस्था करावी, या मागण्यांचा समावेश आहे़ शिवाय सकाळी विदर्भ एक्सप्रेस आल्यानंतर बल्लारशा पॅसेंजर सोडावी़ मुंबई येथून हिंगणघाट, चंद्रपूर, बल्लारशा येथे जाणारे प्रवासी विदर्भ एक्सप्रेसने येतात; पण तत्पूर्वीच बल्लारशा पॅसेंजर निघून जाते़ यामुळे प्रवाशांना त्रास होतो. अनेक वर्षांपासून बंद पडलेले पार्सल कार्यालय सुरू करावे, भूगाव व चितोडा रेल्वे स्थानकावर पॅसेंजर गाड्या बऱ्याच वेळ रोखल्या जातात, त्या वर्धा व सेवाग्राम स्थानकावर घ्याव्या, अमरावती ते बल्लारशा अशी नवीन गाडी सुरू करून ती दुपारी चालवावी अशी मागणीही करण्यात आली़
यावर प्रबंधकानी वर्धा रेल्वे स्थानकावरील मालधक्का येथे फलाट क्र. १ त्वरित सुरू करण्यात येईल, काही साप्ताहिक गाड्यांना वर्धा येथे थांबा देण्यात येईल, मुत्रीघर, शौचालय, स्नानगृह व पेयजलाची त्वरित व्यवस्था केली जाईल़ सेवाग्राम रेल्वे स्थानकावर ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची व्यवस्था केली येईल. पार्सल आॅफीस सुरू होईल़ सेवाग्राम व देवळी रोडवरील रेल्वे आरक्षण खिडकी सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सुरू करण्याबाबत त्वरित निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली़ यावेळी मदन चावरे, रमेश केला, निलेश किटे, निलेश गावंडे यासह पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)