वर्धा पेटले, पारा ४७.५ अंशावर
By Admin | Updated: May 20, 2015 02:24 IST2015-05-20T02:24:26+5:302015-05-20T02:24:26+5:30
दोन दिवसापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. मंगळवारी जिल्ह्याचा पारा ४७.५ अंशावर पोहोचला असून पाच वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी करण्यात आली.

वर्धा पेटले, पारा ४७.५ अंशावर
वर्धा : दोन दिवसापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. मंगळवारी जिल्ह्याचा पारा ४७.५ अंशावर पोहोचला असून पाच वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी करण्यात आली. त्यामुळे सर्वत्र आज केवळ तापमान हाच चर्चेचा विषय होता. तापमानात अचानक झालेल्या वाढीमुळे नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यांवर चिटपाखरूही दिसत नव्हते. रस्ते निर्मनुष्य झाल्याने शहरात भर दुपारी अघोषित संचारबंदी असल्याचा भास होत होता.
गत काही दिवसांत ढगाळ वातावरणामुळे ४४ पर्यंत पोहोचलेला पारा ३६ अंशावर आला होता. त्यामुळे नागरिक काहीसे सुखावले होते. परंतु सोमवारपासून पुन्हा सूर्याने आग ओकायला सुरुवात करीत पारा ४५.२ अंशावर पोहोचला होता. परंतु मंगळवारी यावरही कडी करीत पारा तब्बल ४७.५ अंशावर पोहोचला. त्यामुळे आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. आणखी काही दिवस ही उष्णलाट कायम राहील असे सांगण्यात येत आहे.
मे हिटचा तडाखा सध्या सुरू झाला आहे. या महिन्यात सरासरी ४० ते ४२ पर्यंत तापमान असते. परंतु मंगळवारी पारा ४७ वर गेल्याने सर्वत्र उन्हाचा दाहकता वाढली होती. तापमान ४० च्या वर गेल्यास शरीरातील पाण्याची पातळी ही कमी होत असते. त्यामुळे घरून निघताना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच डोक्याला व कानाला गुंडाळल्याशिवाय बाहेर न पडण्याचा सल्लाही दिला जात आहे.
कितीही तापमान वाढले तरी आवश्यक ती कामे करावीच लागतात. यासाठी घराबाहेर पडावेच लागते. मात्र या उष्ण लाटेने अनेकजण आजची कामे टाळताना दिसली. त्यामुळे दिवसभर वर्दळ राहात असलेल्या शहरातील मुख्य मार्गासह गल्लीबोळातही शुकशुकाट होता. लग्नसराईची धावपळ सुरू असतानाही मार्केट परिसरात विशेष गर्दी जाणवत नव्हती. या उष्णतेत कुलरचाही परिणाम जाणवत नसल्याची स्थिती निर्माण झाली होती. यंदाची ही उष्ण लाट नागरिकांना बेजार करुन गेली. सायंकाळी ७ वाजतानंतर अनेकजण घराबाहेर पडले.(शहर प्रतिनिधी)
अनेकांचे वेळापत्रक कोलमडले
सर्वांचेच आयुष्य गातिमान झाले आहे. त्यामुळे उन्ह, वारा पावसातही कामे ही करावीच लागतात. परंतु वाढलेला पारा या सर्वांवर हावी झाला आहे. त्यामुळे अनेकांचे नियोजन कोलमडले असून अनेक जण शक्य होईल ती कामे दिवसाच आटोपून भर उन्हात घराच्या बाहेर पडण्याचे टाळत आहे. त्यामुळे नेहमीचे वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य झाले आहे.
महिला वर्गही दुपारची खरेदी टाळून ती सकाळी किंवा सायंकाळी उन्हाची दाहाकता कमी झाल्यावर करण्याचा प्राध्यान्य देत आहे. आणखी काही दिवस असेच वेळापत्रक राहील असे दिसून येत आहे.
या दिवसांत हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु उन्हामुळे भाज्याही लवकर खराब होत आहेत. सकाळची हिरवी भाजी सायंकाळपर्यंत टिकवून ठेवणे भाजी विक्रेत्यांसाठी जिकरीचे झाले आहे. त्यामुळे सतत पाण्याचा मारा करून किंवा ओल्या पोत्यांमध्ये भाज्या ठेवून त्या जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या दिवसांत तरबूज, आंबा, संत्री द्राक्ष अशी फळे खाण्यावर भर दिला जातो. परंतु उन्हामुळे या फळांचे वजन दिवसागणिक कमी होत जाते. बरेचदा फळे खराबही होतात. त्यामुळे विक्रेत्यांना आर्थिक फटका बसत आहे.
गव्हाला ऊन्ह फायद्याचे
वाढते ऊन्ह सर्वांसाठीच त्रासदायक ठरत असले तरी काही बाबतीत ते फायद्याचेही ठरत आहे. याच दिवसाच वर्षभराचा गहू घेऊन तो स्वच्छ करून कोठ्यांमध्ये भरून ठेवला जातो.
गहू वर्षभर टिकण्यासाठी त्याला भरपूर उन्ह देणे गरजेचे असते. कारण थोडासाठी ओलावा आल्यास गहू सडतो. सध्या गव्हाची वाळवण सुरू आहे. ४५ अंशावर पारा चढल्याने गव्हाला चांगली उन्ह मिळत आहे. परिणामी हा गहू वर्र्षभर चांगल्या प्रकारे टिकणार अशी प्रतिक्रिया ग्रामीण भागातील नागरिक व्यक्त करीत आहे.