वर्धा-नागपूर मार्ग ठरतोय अपघात मार्ग
By Admin | Updated: August 31, 2015 01:57 IST2015-08-31T01:57:03+5:302015-08-31T01:57:03+5:30
वर्धा- नागपूर महामार्ग हा राज्य क्रमांक ३ चा महामार्ग आहे. परंतु सध्या या मार्गाची दुरवस्था झाली असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

वर्धा-नागपूर मार्ग ठरतोय अपघात मार्ग
सेलूत तहसीलदारांना साकडे : समस्येकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा
वर्धा : वर्धा- नागपूर महामार्ग हा राज्य क्रमांक ३ चा महामार्ग आहे. परंतु सध्या या मार्गाची दुरवस्था झाली असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यावर मार्ग काढण्याकरिता सेलूच्या वीर भगतसिंह संस्थेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत रस्त्यासंबंधी असलेल्या समस्या मार्गी काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
राज्य महामार्ग असलेल्याा या रस्त्याची अवस्था सध्या एखाद्या पायरस्त्याप्रमाणे झाली आहे. यावर वाहने चालविणे कठीण झाले आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे राज्य पसरले आहे. यामुळे हा रस्ता आता जीवघेणा ठरत आहे. दळण-वळणाचा एक प्रमुख मार्ग असून म्हणून या रस्त्याची नोंद आहे. त्याच कारणाने या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते.
त्यात हा फक्त एकपदरी मार्ग असल्याने लहान पासून ते जड वाहनापर्यंतच्या वाहतुकीमुळे नागरिकांना नाहक त्रासाला समोरे जावे लागत आहे.
शाळा, महाविद्यालये यातील मुले आणि नोकरीसाठी ये-जा करणाऱ्यांकरिता हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. या रस्त्यावरून अनेक नागरिक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याचा आरोप भगतसिंह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मोठ्या प्रमाणात मार्गावर रोज एक ना एक अपघात होणे ही बाब नित्याचीच झाली आहे. आतापर्यंत कित्येकांनी या मार्गावर आपले प्राण गमविले आहे. सेलूनजीक मार्गावर पडलेले खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात येत आहे. यात पुन्हा त्याची अवस्था जशीच्या तशी होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या सर्व प्रकाराकडे संपूर्णत: प्रशासन तसेच संबंधित विभाग डोळेझाक करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याच प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आणि प्रशासनास जागे करण्यासाठी वीर भगतसिंह ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था सेलूने एक पाऊल उचलत तहसील कार्यालयाला याबाबत निवेदन दिले. या प्रकरणाचे लवकरात लवकर निवारण करण्याचे आश्वासन तहसीलदार सेलू यांनी संस्थेच्या अध्यक्षाला दिले. या समस्येचे योग्य ते निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विर भगतसिंह ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था सेलूच्या सदस्यांकडून करण्यात आला.
निवेदन देतेवेळी संस्थेचे अध्यक्ष हेमंत नाईकवाडे तसेच विकास मोरमवार, निसार सैय्यद, करन धनुले, सुरज वैद्य, शिवा डुकरे, मनीष खंडाळकर, सागर डाखोळे, रोशन तळवेकर, विशाल सावरकर, स्वप्नील तिजारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)