वर्धा नगराध्यक्ष; काँग्रेसच्या उमेदवारीकरिता सहा जण इच्छुक
By Admin | Updated: October 22, 2016 00:47 IST2016-10-22T00:47:02+5:302016-10-22T00:47:02+5:30
येथील नगर पालिकेसाठी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांना शुक्रवारी आपले नामांकन सादर करायचे होते.

वर्धा नगराध्यक्ष; काँग्रेसच्या उमेदवारीकरिता सहा जण इच्छुक
मुलाखती : नगरसेवकपदासाठी १०३ जणांकडून प्रस्ताव
वर्धा : येथील नगर पालिकेसाठी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांना शुक्रवारी आपले नामांकन सादर करायचे होते. नगराध्यक्षपदासाठी सहा तर १९ प्रभागातील ३८ जागांकरिता एकूण १०३ इतक्या जणांना आपले प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे.
वर्धा नगराध्यक्षपदासाठी पक्षातील सदस्यांसह काही दुसऱ्या पक्षात असलेल्यांकडून पक्षश्रेष्ठींकडे आपले नामांकन सादर केल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. पक्षश्रेष्ठी यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करतील, असेही सूत्राने सांगितले. नगराध्यक्ष पद थेट जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सद्भावना भवनात शुक्रवारी सकाळी ८ वाजता प्रस्तावासह इच्छुकांना मुलाखतीसाठी बोलाविले होते. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सचिव व वर्धा शहराचे पक्षाचे निरीक्षक अतुल कोटेचा आले होते. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष चारुलता टोकस, माजी राज्यमंत्री आ. रणजित कांबळे, आ. अमर काळे, माजी नगराध्यक्ष व प्रदेश सचिव शेखर शेंडे, शहर अध्यक्ष राजेंद्र शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मुलाखतींचा कार्यक्रम पार पडला. मुलाखतीच्या कार्यक्रमाला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इच्छुकांच्या नावाची यादी वरिष्ठ पातळीवर सादर करून नंतरच त्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती पक्षाच्या सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली.(जिल्हा प्रतिनिधी)