राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्वागतासाठी वर्धा नगरी सज्ज
By Admin | Updated: November 25, 2014 22:59 IST2014-11-25T22:59:15+5:302014-11-25T22:59:15+5:30
महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्वागतासाठी वर्धा नगरी सज्ज झाली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमण हटविण्यात आले. काही रस्त्त्यांची डागडूजी करण्यात आली.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्वागतासाठी वर्धा नगरी सज्ज
चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त
वर्धा : महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्वागतासाठी वर्धा नगरी सज्ज झाली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमण हटविण्यात आले. काही रस्त्त्यांची डागडूजी करण्यात आली. यासोबतच सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली. या सर्व व्यवस्थेचा मंगळवारी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी आढावा घेतला. दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी सर्वखबरदारी घेण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्यात.
राष्ट्रपती यांचे दुपारी २.१५ वाजता विशेष हेलिकॉप्टरने वर्धेत आगमण होईल. दुपारी २.३० वाजता बजाजवाडी येथील प्रदर्शनाला भेट देतील. ३.०५ वाजता जी.एस. कॉमर्स महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित शताब्दी महोत्सव समारोहाला उपस्थित राहतील. सायंकाळी ४.१० वाजता सेवाग्राम आश्रमकडे प्रयाण करतील. ४.१० ते ४.२५ वाजेपर्यंत ते आश्रमात राहतील. यानंतर ४.२५ वाजता सेवाग्राम आश्रमातून हेलिपॅडकडे प्रयाण करतील. येथून ४.४५ वाजता विशेष हेलिकॉप्टरने नागपूरसाठी रवाना होतील. दरम्यान त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहेत.
आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक सुरक्षा जयजितसिंग, राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपआयुक्त रंजन शर्मा, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी, शिक्षा मंडळाचे अधिकारी संजय भार्गव, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गाढे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या स्वागतासह हेलीपॅडवर, कार्यक्रमस्थळी जाण्याची व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था आणि स्वागतासाठी निमंत्रितांची यादी याबाबतही विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला. राष्ट्रपती बजाजवाडीला भेट देणार आहेत. या वास्तूत स्वातंत्र्य आंदोलनातील विविध थोर व्यक्तींनी भेटी दिल्या होत्या. येथे पंडित जवाहरलाल नेहरू तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याही विशेष खोल्या आहेत. शिवाय येथे कमलनयन बजाज, डॉ. राजेंद्रप्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, आचार्य कृपलानी यांची दुर्मीळ छायाचित्रे आहेत.
शिक्षा मंडळाचा शतकमहोत्सवी समारंभ जी.एस. कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. येथे उभारण्यात आलेला सभा मंडप व सुरक्षेसंदर्भात करण्यात आलेली व्यवस्था निमंत्रितांसाठी तसेच राष्ट्रपतींसोबत दिल्लीहून येणाऱ्या वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या आसन व्यवस्थेचाही आढावा घेतला. राष्ट्रपतींच्या आगमणाप्रसंगी प्रोटोकॉलनुसार करावयाच्या सुविधा तसेच वाहतूक, दूरध्वनी, आवश्यक सुरक्षा आदी व्यवस्थेबाबतही माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी सोना व जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त प्रशासकीय तसेच सुरक्षा व्यवस्थेसंबंधात केलेल्या व्यवस्थेसंदर्भात माहिती दिली. यावेळी जिल्हास्तरावरील अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)