थंडीची लहर : पारा ८.८ अंशापर्यंत घसरलावर्धा : गत दोन दिवांपासून जिल्ह्यात थंडीची लहर पसरली आहे. जिल्ह्याचा किमान पारा ९ अंशापर्यंत घसरला आहे. शहरात सकाळी व सायंकाळच्यावेळी रस्त्यावरची गर्दी या थंडीमुळे कमी झाल्याचे दिसून आले. गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पारा ८.८ अंशावर असल्याची माहिती आहे.हिवाळा सुरू झाला तरी थंडी जाणवत नव्हती. अशात अचानक गत दोन दिवसांपासून थंडीची लहर जाणवत आहे. दिवसभर अंगावर ऊनी कपडे घालून नागरिक फिरत आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून साधारणत: हिवाळ्यात सुरुवात होते. यात डिसेंबर अर्ध्यावर आला तरी पारा ३० अंशाच्या आसपास राहत होता. यामुळे दिवसा गरमी व रात्रीच्या सुमारास थंडी असे साधारण वातावरण होते. यामुळे नागरिकांनाही थंडीची प्रतीक्षा होतीच. अशात गत दोन दिवसांपासून वातावरणात वाढलेला गारठा नागरिकांना हवाहवासा वाटत आहे. घरी कपाटात ठेवलेले गरम कपडे या दोन दिवसांच्या थंडीमुळे बाहेर निघाले आहे. सकाळी उन्ह निघताच घराच्या गच्चीवर त्यात बसणारे नागरिक दिसू लागले आहेत. ही शितलहर संपत नाही तोपर्यंत थंडीची लाट अशीच राहणार असल्याचे जिल्ह्याच्या हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. जोपर्यंत वातावरणात किमान तापमानाचा पट्टा निर्माण होणार नाही तोपर्यंत ही स्थिती अशीच राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
वर्धा गारठले
By admin | Updated: December 18, 2014 22:58 IST