वर्धा बाजार समितीत शेतकऱ्यांना पाच रुपयांत पोटभर जेवण
By Admin | Updated: October 18, 2015 02:23 IST2015-10-18T02:23:23+5:302015-10-18T02:23:23+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य घेवून आलेल्या शेतकऱ्यावर मुक्कामाची वेळ आल्यास उपाशी पोटी झोपण्याशिवाय पर्याय नव्हता.

वर्धा बाजार समितीत शेतकऱ्यांना पाच रुपयांत पोटभर जेवण
वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य घेवून आलेल्या शेतकऱ्यावर मुक्कामाची वेळ आल्यास उपाशी पोटी झोपण्याशिवाय पर्याय नव्हता. संचालक मंडळाने यावर तोडगा काढत मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना पाच रुपयात पूर्ण जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या सभेत घेण्यात आला आहे.
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत रक्कम व जागा उपलब्ध असताना केवळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना असुविधेचा सामना करावा लागत होता. आता नव्याने आलेल्या संचालक मंडळाने बाजार समितीचाविकास करण्यासंदर्भात निर्णय घेणे सुरू केल्याचे दिसू आहे. शनिवारी समितीत उपाध्यक्ष पांडूरंग देशमुख यांच्या उपस्थितीत कापूस व धान्य व्यापारी, अडते तथा संचालक मंडळ यांची संयुक्त सभा घेण्यात आली. सदर संयुक्त सभेत समितीतर्फे जे शेतकरी समितीच्या यार्डवर धान्य व कापूस विक्रीस घेवून येईल त्या शेतकऱ्यांना ५ रुपयात पोटभर जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर निर्णय शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून घेतला असून मालविक्रीस रात्र झाल्यास झोपण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आल्याचे बाजार समितीकडून कळविण्यात आले आहे.
समितीच्या सन २०१४-१५ च्या आमसभेत उपाध्यक्ष पांडूरंग देशमुख यांनी कास्तकारास स्वस्त भावात लवकरात लवकर जेवण देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आपला संकल्प पूर्णत्वास नेला आहे. सदर योजनेस समितीचे सभापती शरद देशमुख आणि समितीचे सर्व सदस्य तसेच अडते व व्यापारी यांचे सहकार्य लाभत आहे. शेतकरी बंधूनी आपला कापूस व धान्य माल समितीच्या यार्डवर विक्रीस आणावा व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसभापती पांडूरग देशमुख यांनी या प्रसंगी केले.(प्रतिनिधी)