वर्धा - परीक्षा प्रवेश पत्राकरिता ३०० विद्यार्थ्यांची तारांबळ
By Admin | Updated: November 5, 2016 20:34 IST2016-11-05T20:34:39+5:302016-11-05T20:34:39+5:30
रा. सू. बिडकर महाविद्यालयातील तब्बल ३०० विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्राकरिता शनिवारी रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आली

वर्धा - परीक्षा प्रवेश पत्राकरिता ३०० विद्यार्थ्यांची तारांबळ
>ऑनलाइन लोकमत
हिंगणघाट (वर्धा), दि. 5 - महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याचे येथील रा. सू. बिडकर महाविद्यालयात उघड झाले. या महाविद्यालयातील तब्बल ३०० विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्राकरिता शनिवारी रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आली. रविवारी परीक्षा असताना विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशपत्राकरिता आंदोलन करावे लागले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरच्या बीएससी अभ्यासक्रमाची परीक्षा रविवारी आहे. यामुळे गत दोन दिवसांपासून प्रवेशपत्राकरिता विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयात चकरा सुरू होत्या. असे असतानाही या गंभीर बाबीकडे महाविद्यलयाने दुर्लक्ष केले. आवश्यक कागदपत्रांनी पूर्तता केल्यानंतर शनिवारी रात्री विद्यापीठाकडून ओळखपत्र पाठविण्यात आल्याने ते रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे काम सुरू होते. यामुळे विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.
हिंगणघाट येथील रा.सू. बिडकर महाविद्यालय यंदाच्या प्रवेश सत्रापासूनच चर्चेत आले आहे. हा वाद थांबतो न थाबतो तोच ऐन परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा ओळखपत्राचा मुद्दा चर्चेत आला. बीएससी अभ्यासक्रमाची परीक्षा रविवारी असताना या महाविद्यालयात असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळाले नाही. यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रवेशपत्राकरिता विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना योग्य उत्तर मिळाले नाही. यामुळे त्यांच्या मनात वर्षे वाया जाण्याची भीती निर्माण झाली. महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका या विद्यार्थ्यांना सहन करावा लागला.
महाविद्यालय प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचा रोष वाढत असताना महाविद्यालयाने कागदपत्रांची पूर्तता केल्याने रात्री उशिरा विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र देण्यात आले. यातही प्रवेशपत्राची प्रक्रीया आॅनलाईन असल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच परवड होत असल्याचे दिसून आले आहे. महाविद्यालयाच्यावतीने रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्याचे काम सुरू होते.
महाविद्यालयाकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नाही
विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र देण्याकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नसल्याने प्रवेशपत्राकरिता विद्यार्थ्यांना भटकावे लागल्याची माहिती आहे.
प्रवेश प्रक्रियेतही घोळ
या महाविद्यालयात अतिरिक्त शुल्क घेवून प्रवेश देण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून या महाविद्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली होती. या चौकशीत महाविद्यालयातील एका प्राध्यापकाला अटकही करण्यात आली होती.
महाविद्यालयाच्यावतीने परीक्षा अर्ज भरताना आवश्यक कागदपत्र देण्यात आले नाही. महाविद्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना अडचण झाली. महाविद्यालयाच्यावतीने आज उशिरा कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्याने रात्री उशिरा प्रवेशपत्र देण्यात आले आहे.
- प्रमोद येवले, प्र कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर.
ऐन परीक्षेच्यावेळी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देणे हा अन्याय आहे. या संदर्भात विद्यापीठाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यावर कारवाई करून त्यांना सेवामुक्त करावे.
- मनोज रुपारेल, आम आदमी पार्टी, हिंगणघाट