व्हीआयपी रोडवर यमराज करतोय प्रतीक्षा!
By Admin | Updated: February 11, 2017 00:55 IST2017-02-11T00:55:05+5:302017-02-11T00:55:05+5:30
शहरातील विविध मार्गांपैकी महत्त्वाचा महामार्ग म्हणून नालवाडी चौक ते विश्रामगृह चौक हा व्हीआयपी मार्ग आहे.

व्हीआयपी रोडवर यमराज करतोय प्रतीक्षा!
मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे : वाहनचालकांना नाहक त्रास
वर्धा : शहरातील विविध मार्गांपैकी महत्त्वाचा महामार्ग म्हणून नालवाडी चौक ते विश्रामगृह चौक हा व्हीआयपी मार्ग आहे. परंतु, याच मार्गाची सध्या दैनावस्था झाली आहे. या मार्गावरील जीवघेणे खड्डे मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्याकडे संबंधीतांचेही दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याच्या दैनावस्थेमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून सदर रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करणे गरजेचे आहे.
सेवाग्रामकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने वगळता दुचाकी व चारचाकी छोटी वाहने स्थानिक विश्रामगृह चौकातून वळण घेत नालवाडी चौक होत पुढील प्रवासाकरिता रवाना होतात. विश्रामगृह ते नालवाडी चौक या मार्गाला व्हीआयपी मार्ग म्हणून ओळख असली तरी याच मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या मार्गावरील काही ठिकाणीची गिट्टी उघडी पडली आहे. तर काही परिसरात गिट्टीची चुरी पडून आल्याने सदर प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. या मार्गावरून जड वाहनांना ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, रस्त्यावर असलेले ठिकठिकानचे खोल खड्डे इतरांच्या जीवीतास धोकादायक ठरत आहे. रस्ता अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याचे अनेक उदाहरणे असून अनेकांना कायमचे अपंगत्त्व आले आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करूनच पुढील प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास रस्त्यावरील खोल खड्डे सहज दिसून येत नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या दैनावस्थेमुळे परिसरातील नागरिकांसह वाहनचालक मेटाकुटीस आले आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत नालवाडी चौक ते विश्रामगृह चौक या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)