‘त्या’ रस्त्याला सिमेंटीकरणाची प्रतीक्षा
By Admin | Updated: February 19, 2015 01:23 IST2015-02-19T01:23:05+5:302015-02-19T01:23:05+5:30
विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथील विठ्ठल-रुख्माई देवस्थान ते संत नामदेव महाराज समाधी स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ...

‘त्या’ रस्त्याला सिमेंटीकरणाची प्रतीक्षा
घोराड : विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथील विठ्ठल-रुख्माई देवस्थान ते संत नामदेव महाराज समाधी स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सिमेंटीकरणाची प्रतीक्षा कायम आहे. या रस्त्याचे सिमेंटीकरण तत्कालीन खासदार सुरेश वाघमारे यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आले होते; पण अल्पावधीत या रस्त्याचे दुरवस्था झाली़ सध्या रस्त्याच्या दुरूस्तीची गरज असताना संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे़ यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे़
विधानसभा निवडणूकीपूर्वी या रस्त्याचे नव्याने सिमेंटीकरण करण्यासाठी खासदार रामदास तडस यांनी भूमिपूजन कार्यक्रम घेत विकासाचा नारळ फोडला होता़ भाजपाच्या खासदाराने बांधलेल्या रस्त्याचे नुतनीकरण त्याच पक्षाच्या खासदाराला करावे लागण्याची कदाचित ही पहिलीच वेळ होती; पण भूमिपूजनानंतर प्रत्यक्ष काम सुरूच झाले नाही़ यामुळे या रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी ग्रामस्थांसह भाविकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे़ सदर भूमिपूजन निवडणुकीपूरतेच तर नव्हते ना, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. घोराड हे तिर्थस्थळ असून तिर्थस्थळाचा विकास हा ध्यास असल्याचे उपस्थित नेत्यांनी सांगितले होते; पण हा ध्यास प्रतीक्षेतच तर संपणार नाही ना, असा प्रश्नही उपस्थित होत आहे़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत रस्त्याच्या दुरूस्तीची प्रतीक्षा दूर करावी, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)