फळबाग योजनेतील शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा
By Admin | Updated: October 26, 2016 00:57 IST2016-10-26T00:57:39+5:302016-10-26T00:57:39+5:30
शासनाने मनरेगा अंतर्गत शेतकऱ्याना लागवडीकरिता प्रोत्साहित करून फळबा योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

फळबाग योजनेतील शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा
शेतकरी मेटाकुटीस : मनरेगा अंतर्गत केली लागवड
आकोली : शासनाने मनरेगा अंतर्गत शेतकऱ्याना लागवडीकरिता प्रोत्साहित करून फळबा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यात लाभार्थी निवड करून जून महिन्यात रोप खरेदी करून लागवड केली; पण या शेतकऱ्यांना गत पाच महिन्यांपासून अनुदान राशी दिली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सेलू पंचायत समितीच्या आकोली येथील अनिल दखणे या शेतकऱ्याने शासनाच्या फळबाग लागवड योजनेतून एक हेक्टरमध्ये ३०० लिंबूची झाडे लावली. जूनमध्ये रोपे खरेदी केली व त्याच महिन्यात लागवड केली. रोप खरेदीचे देयक सादर केल्यानंतर ग्रामसेवकाने शेतात येऊन फळबाग लावगडीची पाहणी केली. सेलू पंचायत समितीतील कृषी विभागाने आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान राशी जमा करणे बंधनकारक केल होते, पण पाच महिने लोटूनही खात्यात रक्कम जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांची फरफट होत आहे.
सदर शेतकऱ्यांने अनेकदा गटविकास अधिकारी व कृषी विस्तार अधिकाऱ्यांची भेट घेऊन अनुदान राशीची मागणी केली. मात्र प्रत्येकवेळी दोन दिवसात खात्यात रक्कम जमा होईल, अशी थाप मारून शेतकऱ्यांची फसगत केली. पारंपारिक शेतीत होणारे नुकसान टाळण्याकरिता ही योजना सुरू केली; मात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याऐवजी यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडकवणुकीमुळे नैराश्य येत असल्याचे एकूण चित्र आहे.(वार्ताहर)