क्रांतीस्थळाला राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जाची प्रतीक्षाच
By Admin | Updated: August 7, 2016 00:13 IST2016-08-07T00:13:33+5:302016-08-07T00:13:33+5:30
ब्रिटीश गुलामगिरीला संपुष्टात आणून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी रक्तरंजित क्रांती करणाऱ्या शहिदांच्या बलिदानाचे प्रतिक असलेल्या

क्रांतीस्थळाला राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जाची प्रतीक्षाच
स्वातंत्र्य लढ्यापासून मागणी : विकास निधीच्या खर्चावरून राजकारण
अमोल सोटे आष्टी (शहीद)
ब्रिटीश गुलामगिरीला संपुष्टात आणून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी रक्तरंजित क्रांती करणाऱ्या शहिदांच्या बलिदानाचे प्रतिक असलेल्या येथील क्रांतीस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी गत ७४ वर्षांपासून आहे; पण याकडे सदैव दुर्लक्ष होत आहे. शासनाने ही मागणी मान्य करून या स्थळाचा विकास केल्यास ती खऱ्या अर्थाने शहिदांना श्रद्धांजली ठरेल, असे शहीद भूमितील नागरिकांचे म्हणणे आहे. येथील क्रांती नागपंचमीला झाल्याने रविवारी असलेल्या नागपंचमिनिमित्त ही मागणी ऐरणीवर आली आहे.
गतवर्षी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्याचे अर्थ तथा वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आष्टीला आले होते. यावेळी क्रांतीस्थळाला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी हुतात्मा स्मारक समिती अध्यक्ष प्रा. विनायक पारे, सचिव भरत वणझारा यांनी केली होती. क्षणाचाही विलंब न लावता ना. मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसीत करण्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर करून अवघ्या तीन महिन्यांत निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये स्थानिक राजकारण्यांनी पक्षाच्या झेंड्यावर गावातील विकासकामे मंजूर करण्यासाठी ३ कोटी रुपयांची वाट लावल्याने मुख्य उद्देश बाजूला राहिला. उर्वरित २ कोटी रुपये क्रांतीस्थळाला खर्च करण्यासाठी राजकारण सुरू आहे. सर्वपक्षीय मंडळी एकत्र येऊन राष्ट्रीय स्मारकाच्या विकासासाठी हातभार लावायला तयार नाहीत.
देशभक्तीचे प्रतिक असलेली क्रांतीस्थळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा निर्माण करण्यासाठी कायम तेवत राहतील, हा उद्देश लक्षात घेऊन हुतात्मा स्मारक समितीने क्रांतीस्थळी कार्यरत हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय खाली करण्याचे पत्र नगर पंचायतीला दिले. त्यामुळे या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक घोषित करून ते विकसीत करावे. सोबतच स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी महत्त्व प्राप्त झालेल्या स्थळांना पर्यटनस्थळ घोषित करून विकास केल्यास विद्यार्थ्यांना व पर्यटन प्रेमींसाठी रमणीय स्थळ निर्माण होणे सहज शक्य आहे.
यामध्ये कपिलेश्वर देवस्थान परिसरात बालोद्यान तयार करणे, आष्टी तलावाचे पर्यटनस्थळाच्या माध्यमातून सौंदर्यीकरण करणे. ज्या ठिकाणी ब्रिटीश पोलिसांना तलावाच्या पाण्यात बुडवून मारले होते, त्या स्थळाला विशेष महत्त्व आहे. पोलीस संमद याला पकडण्यासाठी शहीद भूमीतील क्रांतीकारक निमसगाव टेकडीवर पाहायला गेले होते, ती टेकडी पैठणच्या धर्तीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उद्यान म्हणून विकसीत करावी. सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या शहीद रशीद खाँ नवाब यांच्या कबर स्थळाचा विकास करावा. सहा शहिदांना एकाच ठिकाणी भडाग्नी दिला, त्या स्थळाचा पूर्ण विकास करावा, या सर्व मागण्या असून त्या अजूनही प्रलंबित आहेत.