सरायला ‘राज्य संरक्षित स्मारका’ची प्रतीक्षा
By Admin | Updated: January 22, 2015 02:00 IST2015-01-22T02:00:57+5:302015-01-22T02:00:57+5:30
संतांच्या भूमीचा वारसा लाभलेला महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. शिवाजी महाराज, संभाजी राजे, पेशवे, भोसले यासारखे शूरविर इतिहासाची साक्ष देतात.

सरायला ‘राज्य संरक्षित स्मारका’ची प्रतीक्षा
देवकांत चिचाटे नाचणगाव
संतांच्या भूमीचा वारसा लाभलेला महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. शिवाजी महाराज, संभाजी राजे, पेशवे, भोसले यासारखे शूरविर इतिहासाची साक्ष देतात. राज्यातील विविध जिल्ह्यातील किल्ले, गड, मंदिर, वाडे आजही याची साक्ष देतात. काळाच्या ओघात अशा ऐतिहासिक वास्तूची पडझड होऊ नये तसेच त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी अशा वास्तुंना राज्य संरक्षित स्मारक घोषित करून त्यांचे जतन व संरक्षण करण्याचे काम राज्य शासन करते. शासनाच्या पुरातत्व विभागामार्फत या राज्य संरक्षित वास्तुची जोपासना केली जाते; पण येथील भोसलेकालीन इतिहासाची साक्ष देणारी सराय अद्यापही उपेक्षित आहे़ सरायचे राज्य संरक्षित वास्तु घोषित करून जतन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे़
काय आहे राज्य संरक्षित वास्तू
शासनाकडून ऐतिहासिक वास्तुचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केल्यानंतर त्या वास्तुला राज्य संरक्षित वास्तु म्हणून घोषित केले जाते. राज्य पुरातन विभागाकडून अशा वास्तुचे जतन व संवर्धन करण्यात येते. स्मारक, किल्ले, मंदिर यांचा त्यावेळच्या इतिहासावर झालेला परिणाम, वास्तुच्या सध्याच्या स्थितीचा विचार करून तसेच मूळ स्थापत्य कला लक्षात घेऊन ऐतिहासिक वास्तु अधिकाधिक काळ कशी टिकेल, मूळ कलेलाही धक्का पोहोचणार नाही, या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर सदर वास्तु राज्य संरक्षित वास्तु म्हणून घोषित केली जाते़
जतन-संवर्धन काय आहे?
शासनाच्यावतीने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेल्या वास्तुचे पुरातत्व विभागाकडून जतन, संवर्धन करताना मूळ स्थापत्य टिकविण्याकडे लक्ष असते़
जीर्ण होत असलेले वाडे, स्मारक, किल्ले आदींचा त्याकाळच्या इतिहासातील महत्त्व व आजचा त्यावर झालेला परिणाम, याचाही विचार करण्यात येतो.
संरक्षित वास्तूच्या देखभाल व दुरस्तीची जबाबदारी पुरातत्त्व विभागाद्वारे स्वीकारली जाते. वास्तुचा एखादा भाग कोरला असला तर तो दुरूस्त करताना ती दुरूस्ती मूळ बांधकामानुसार करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो़ यातून वास्तूचे सौंदर्य अबाधित राखण्याचे प्रयत्न केले जातात़
पुरातत्त्व विभागाची उदासीनता
नाचणगाव येथील सराय ही भोसलेकालीन इतिहासाची साक्ष देणारा ऐतिहासिक ठेवा आहे़ ही सराय गत कित्येक वर्षांपासून राज्य संरक्षित वास्तु घोषित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. तत्कालीन सरपंच हरिभाऊ साठे, शंकर राऊत, जि.प. सदस्य दिलीप अग्रवाल यांनी सराय राज्य संरक्षित वास्तु व्हावी म्हणून सांस्कृतिक विभागाकडे पाठपुरावा केला; पण संबधित विभागाच्या उदासिनतेमुळे ते होऊ शकले नाही़ पुरातत्व विभाग हा सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येत असल्याने यासाठी शासनस्तरावर प्रयत्न हाणे गरजेचे झाले आहे़