२१ वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रतीक्षा कायम

By Admin | Updated: November 20, 2014 22:58 IST2014-11-20T22:58:21+5:302014-11-20T22:58:21+5:30

राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाणाऱ्या या गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती व्हावी, यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला़ शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरीही दिली;

Waiting for primary health center for 21 years | २१ वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रतीक्षा कायम

२१ वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रतीक्षा कायम

वायगाव (नि़) : राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाणाऱ्या या गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती व्हावी, यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला़ शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरीही दिली; पण अद्यापही गावात प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण झालेले नाही़ यामुळे २१ वर्षांपासून ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रतीक्षाच करावी लागत असल्याचे दिसते़
या गावाची लोकसंख्या १४ हजारांच्या घरात आहे. गावालगत लहान-मोठी १८ ते २० गावे आहेत़ बाजारपेठ म्हणून ग्रामस्थांना वायगाव येथे यावे लागते. २० वर्षांपूर्वी या गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले होते. यात ग्रामपंचायतीने जागाही निश्चित केली होती; पण या आरोग्य केंद्राची पळवापळवी करण्यात आली होती. राजकीय दबावाचा वापर करून वायगाव (नि.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव (टा.) येथे पळविण्यात आले होते. यानंतर शासनाच्या आरोग्य मंत्रालयाद्वारे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला २७ डिसेंबर १९९७ च्या आदेशाप्रमाणे मंजुरी देण्यात आली; पण अद्याप कुठल्याही हालचाली आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी केल्या नाहीत़ २००८ आणि २०१० मध्ये पुन्हा याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला़ यानंतर मंजुरीच देण्यात आली नसल्याचे निष्पन्न झाले़ यानंतर लोकप्रितिनिधींनी पाठपुरावा करीत मंजुरी मिळविली.
१७ जानेवारी २०१३ च्या अध्यादेशात प्राथमिक आरोग्य केंद्राला पुन्हा मंजुरी प्रदान करण्यात आली होती. सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे जाहीर केलेल्या अध्यादेशातील २५२ पैकी १८० प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन झाले होते; पण अद्यापही १३२ प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थाननिश्चिती झालेली नाही़ हा आदेश मिळाल्यानंतर आरोग्य विभागाद्वारे वायगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या होत्या; पण ग्रा़पं़ च्या जागेवर अतिक्रमण झाले़ यामुळे महसूल विभागाची जागा लक्षात घेत प्रस्ताव आरोग्य विभागाने पाठविला होता. यात विविध कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्रही देण्यात आले होते. महसुलची जागा जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे फेरफार प्रक्रिया सुरू आहे़ यासाठीही प्रतिक्षाच करावी लागत आहे़ वायगाव परिसरातील नागरिक गत २१ वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रतीक्षा करीत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र लवकर होणार या आशेवर कित्येक वर्षे लोटली; पण अद्याप मूर्त रूप आलेले नाही़ शासकीय रुग्णसेवा उपलब्ध नसल्याने परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे़(वार्ताहर)

Web Title: Waiting for primary health center for 21 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.