दारात बसून प्रशांतची येण्याची प्रतीक्षा

By Admin | Updated: June 9, 2014 23:47 IST2014-06-09T23:47:34+5:302014-06-09T23:47:34+5:30

एक आठवडा झाला १६ वर्षीय प्रशांत परत आला नाही. चंद्रमोळी झोपडीच्या दारात बसून त्याची आई रेणुका डोळ्यातील आसवे गाळीत त्याच्या परत येण्याची एकटक वाद पाहत आहे

Waiting for Prashant to sit at the doorstep | दारात बसून प्रशांतची येण्याची प्रतीक्षा

दारात बसून प्रशांतची येण्याची प्रतीक्षा

डोळे वाटेवर : बेपत्ता मुलाच्या शोधासाठी आईवडिलांची धडपड
सेलू : एक आठवडा झाला १६ वर्षीय प्रशांत परत आला नाही. चंद्रमोळी झोपडीच्या दारात बसून त्याची आई रेणुका डोळ्यातील आसवे गाळीत त्याच्या परत येण्याची एकटक वाद पाहत आहे. चिंताग्रस्त उदास चेहर्‍याच्या पत्नीची अवस्था पाहून प्रशांतचे वडील संजय यांच्याही मनाचा तोल सैरभर झाला आहे. आमच्या मुलाचे काही झाले तर नसेल ना? हा केविलावाणा प्रश्न ते येणार्‍या प्रत्येकाला विचारताना त्यांच्या जीवाची कालवाकालव होत आहे.
सेलू तालुक्यातील ब्राह्मणी या  छोट्याशा गावात संजय लक्ष्मण नैताम (४0)  आपली पत्नी रेणुका (३५), मुलगा प्रशांत (१६) व लहान मुलगी पुजा(१३) यांच्यासह एका चंद्रमोळी झोपडीत राहतात. प्रशांतचे वडील गावातील अनिल कुंभारे यांच्या शेतावर सालदार म्हणून तर आई शेतावर रोजमजुरीचे काम करतात. बेपत्ता झालेला प्रशांत सेलूच्या दीपचंद विद्यालयातून नुकताच इयत्ता ९ वी पास झाला होता, तर पूजा सेलू येथील यशवंत विद्यालयातील ६ वी उत्तीर्ण झाली. उन्हातान्हात कष्ट उपसून मुला-मुलीला शिकवून मोठं करण्याच त्याचं स्वप्न होत. पण हाल भोगून मुलांची तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेणार्‍या आईवडीलांच्या स्वप्नाला आता निराशेची झळ पोहचत आहे.
३0 मे ला प्रशांत घरुन अचानक बेपत्ता झाला. सेलू पोलीस स्टेशनला तक्रार तो हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मुलाच्या शोधात त्यांची अनेक गावे पालथी घातली. अनेक गावात दूरध्वनीवरुन शोधण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांशी संपर्क केला मात्र प्रशांतचा ठावठिकाणा नाही. दोन चिमणी-पाखरांच्या किलबिलाटांनी सदैव गजबजलेल्या चंद्रमोळी झोपडीतील उदासपणा आई-वडिलांना आता  अस्वस्थ  करीत  आहे.
प्रशांतच्या   आईवडिलांच्या डोळ्यातील आसवांकडे आणि प्रशांतची धाकटी बहिण पूजा हिला धायमोकलून रडताना पाहिल्यावर पाहणार्‍याचे डोळेही अलगद ओले होतात. आमच्या प्रशांतच्या जीवाचे बरेवाईट तर झाले नसेल ना? तो कुठे असेल, तो अन्नपाण्याविणा कसा रहात असेल असे एक अनेक प्रश्न ते ज्याला त्याला विचारत असतात.
माझा प्रशांत कुणाला दिसल्यास सांगा, मला त्याला शिकवून साहेब करायचं आहे. मोठं करायचं आहे. प्रशांतने बघितलेली स्वप्ने मला वास्तवात बघायची आहे, कुणाला दिसला काहो माझा प्रशांत! अशा कापर्‍या आवाजात चौकशी करणारे त्याचे आईवडील चंद्रमोळी झोपडीच्या दारात बसून त्याच्या येणार्‍या मार्गाकडे एकटक लक्ष देवून आहे.
प्रशांतच्या अचानक बेपत्ता होण्याने एका गरीब कुटुंबाची झालेली अवस्था दूर करण्यासाठी पोलीस प्रशासन व समाजातील जीवंत मनाच्या माणसांनी त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पोलिसांनीही त्याचा लवकर शोध घेण्याची विनवणी करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Waiting for Prashant to sit at the doorstep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.