तीन वर्षांपासून वीज जोडणीची प्रतीक्षा
By Admin | Updated: January 17, 2017 01:10 IST2017-01-17T01:10:17+5:302017-01-17T01:10:17+5:30
कर्ज न घेता स्व-कष्टाने खोदलेल्या विहिरीवरील पंपाला वीज जोडणी देण्यास तीन वर्षांपासून वीज वितरण कंपनी टाळाटाळ करीत आहे.

तीन वर्षांपासून वीज जोडणीची प्रतीक्षा
आदिवासी शेतकरी मारतोय विद्युत कार्यालयाच्या चकरा
वर्धा : कर्ज न घेता स्व-कष्टाने खोदलेल्या विहिरीवरील पंपाला वीज जोडणी देण्यास तीन वर्षांपासून वीज वितरण कंपनी टाळाटाळ करीत आहे. यामुळे वडदचे आदिवासी शेतकरी माणिक राजाराम गेडाम यांची कोंडी झाली आहे. याकडे लक्ष देत वीज जोडणी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
शेतकरी गेडाम यांनी ‘डिमांड नोट’नुसार वीज जोडणी मिळावी म्हणून देवळीच्या विद्युत कार्यालयाकडे २४ फेब्रुवारी २०१४ रोजी रकमेचा भरणा केला. त्यांच्या मालकीचे वडद शिवारात सर्व्हे क्र. २७९/१ मध्ये १ हेक्टर ०८ शेत आहे. त्यांनी २०११ आणि २०१२ या दोन वर्षात स्व-कष्टाने शेतात विहीर खोदली. सुमारे १७ फुट गोटा फोडून त्यांनी ही विहीर केली. यानंतर विहिरीवर मोटारपंप बसविण्यासाठी वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केला. विद्युत कंपनीने त्यांना ५ हजार १०० रुपयांची डिमांडनोट दिली. त्यांनी ही रक्कम भरली; पण त्यांना वीज जोडणी अद्यापही देण्यात आली नाही.
विविध कारणे सांगून दोन वर्षांपासून जोडणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. वारंवार फेऱ्या मारून गेडाम त्रस्त झाले आहेत. शेतातील काम बंद ठेवून त्यांना वीज जोडणी कधी मिळेल, हे विचारण्याकरिता विद्युत कार्यालयात जावे लागते; पण चकरा संपत नाही. वीज जोडणी न मिळाल्याने ५०० रुपये दररोजप्रमाणे खर्च करून त्यांना डिझेल पंपाद्वारे शेतात ओलीत करावे लागत आहे; पण हा खर्च त्यांना शक्य नाही. वीज जोडणी न मिळाल्याने या शेतकऱ्याला शेतात दोन पिके घेता येत नाही. याकडे लक्ष देत त्वरित वीज जोडणी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)