सरपंचपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा
By Admin | Updated: April 24, 2015 23:58 IST2015-04-24T23:58:09+5:302015-04-24T23:58:09+5:30
जिल्ह्यात बऱ्याच ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्याचा निकालही गुरुवारी जाहीर झाला.

सरपंचपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा
दावेदार संभ्रमात : विजयी उमेदवारांनाही लागले सरपंचपदाचे डोहाळे
२७ एप्रिल रोजी होणार आरक्षणाची सोडत
कारंजा (घाडगे) : जिल्ह्यात बऱ्याच ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्याचा निकालही गुरुवारी जाहीर झाला. शासनाच्यावतीने सन २०१५ ते २०२० या कालावधीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमधील सरपंच पदाचे जिल्ह्याचे आरक्षण अद्यापही जाहीर झाले नसल्याने अनेकांना सरपंचपदाचे स्वप्न पडत आहे.
निवडून आलेल्या उमेदवारांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. येत्या २७ एप्रिल रोजी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडात होणार आहे. यात अनुसचित जाती व जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर ६ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महिला आरक्षणाची सोडत होणार आहे.
सरपंच पदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा सध्या शिगेला पोहोचली आहे. येत्या सोमवारी जाहीर होणाऱ्या आरक्षणामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होते वा त्यावर पाणी फेरल्या जाते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शासनाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार सरपंच पदाचे आरक्षण १० एप्रिल पूर्वीच जाहीर होणे गरजेचे होते. विदर्भात वर्धा वगळता अमरावती, यवतमाळ, अकोला व इतर जिल्ह्याचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. जिल्ह्याला हे आरक्षण जाहीर करण्यास काय तांत्रिक अडचण आहे़ याबद्दल जनतेत संभ्रम व प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ जिल्ह्यात ६०० च्यावर ग्रामपंचायत आहे़
गावाचा सरपंच कोणत्या आरक्षित प्रवर्गातून होणार आहे, हे जर माहिती झाले तर जातीय प्रमाणपत्र तयार करणे उमेदवारी निश्चित करणे या कामाला वेग येतो़ आरक्षणामुळे आपली स्वत:ची उमेदवारी जर घोषित करता आली नाही तर इच्छूक उमेदवाराला पर्याय म्हणून आपली पत्नी किंवा आपल्या नियंत्रणातील संबंधीत व्यक्तींची उमेदवारी पुढे करता येते़ जिल्ह्यात सरपंच पदाचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नसल्याने राजकीय पक्षांना आणि इच्छुकांना काळजी पडली आहे़ (तालुका प्रतिनिधी)
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालापूर्वी सरपंचपदाच्या आरक्षाची सोडत होणे गरचेचे होते. मात्र जिल्ह्यात तसे झाले नाही. विदर्भात वर्धा वगळत या कालावधीत निवडणूक असलेल्या इतर जिल्ह्याचे आरक्षण जाहीर झाले. वर्धा याला अपवाद ठरली. अशात निवडणुका झाल्या, त्याचे निकालही जाहीर झाले. निवडूण आलेल्या उमेदवाराची सरपंचपदी आपली वर्णी लागावी अशी इच्छा शिगेला पोहोचली. सरपंचपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा संपणार असून येत्या सोमवारी (दि. २७ एप्रिल) सोडत होणार आहे.
तळेगावात अनेकांना लागले सरपंचपदाचे डोहाळे
तळेगाव (श्या.पं.) - येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. बहुमत मिळालेल्यांना सरपंचपदाचा उमेदवार जाहीर करण्याची घाई झाली आहे. जिल्ह्यात मात्र सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले नसल्याने आत काय करावे, असा प्रश्न पडला आहे. गावात काँग्रेस समर्थित चंद्रशेखर जोरे पॅनलचे १३ उमेदवार निवडून आले आहे. १७ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीमध्ये नऊ उमेदवार बहुमताकरिता लागतात. पाच वर्षांपूर्वी याच गटाची ग्रामपंचायत अस्तित्वात होती. गत पाच वर्षात काँग्रेसच्याच राठी-येसनसुरे गटाच्या हातात ग्रामपंचायत होती. सध्याच्या सरपंचाचा कार्यकाळ हा जुलै अखेरपर्यंत आहे. सरपंच पदाचे आरक्षण अद्याप जाहीर न झाल्याने सर्व निवडून आलेले उमेदवार संभ्रमात आहेत.(वार्ताहर)
ग्रामपंचायतीच आरक्षणाची प्रतीक्षा संपली असून २८ एप्रिल रोजी त्याची सोडत होणार आहे.
- वैभव नावाडकर, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा