झोपडपट्टीवासी स्थायी पट्ट्याच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: January 5, 2015 23:08 IST2015-01-05T23:08:41+5:302015-01-05T23:08:41+5:30
जिल्ह्यातील हजारो कुटुंब स्वत:ची जागा नसल्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करून २५ ते ३० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ती जागा त्यांच्या मालकीची नसल्याने त्यांना घरकुल योजनेचा

झोपडपट्टीवासी स्थायी पट्ट्याच्या प्रतीक्षेत
वर्धा : जिल्ह्यातील हजारो कुटुंब स्वत:ची जागा नसल्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करून २५ ते ३० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ती जागा त्यांच्या मालकीची नसल्याने त्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही. शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरिता स्थायी पट्टे देण्यात यावे, अशी मागणी सेवाग्राम येथील झोपडपट्टी वासीयांनी सोमवारी निर्दर्शने करीत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
अतिक्रमण करून वास्तव्यास असलेले हे नागरिक दारिद्रय रेषेखालील असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना स्वत:ची जागा नाही. त्यांना राहत्या जागेचे पट्टे नसल्यामुळे शासकीय घरकुलाचा लाभ मिळत नाही. स्वत:चे घर चांगले बांधु शकत नाही. शासकीय अद्यादेशात १९९४ ते २००० पर्यंत अतिक्रमण करून राहणाऱ्यांना स्थायी पट्टे द्यावे, असे उल्लेखित आहे.
वारंवार आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना मागणी करूनही पट्टे देण्यात आले नाही. स्थायी पट्ट्यांकरिता अनेकांनी शासनाचा दंड सुद्धा भरलेला आहे. यामध्ये कानगाव, गाडेगाव, चानकी, रोनखेडा, वडर झोपडपट्टी येथील नागरिकांचा समावेश आहे. दंड भरणाऱ्यांना वेळेवर पट्टे दिले नाही तर आरपीआयच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी जिल्हा अध्यक्ष विजय आगलावे यांनी निवेदन सादर करताना दिला.
सेवाग्राम मेडिकल चौकात सरकारी जागेवर अनेक दुकानदारांनी दुकाने लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे. त्यांनी सुद्धा सरकारी जागा लिजवर देण्यात यावी, असे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात अजय मेहरा, प्रकाश पाटील, सुरेंद्र पुनवटकर, मोहन वनकर, संजय वर्मा, देवानंद तेलतुमडे, विनोद वानखेडे, देविदास भगत, संजय गवई, राजु वैद्य यांच्यासह आरपीआचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)