नवीन रोहित्राला विद्युत जोडणीची प्रतीक्षा
By Admin | Updated: October 19, 2016 01:26 IST2016-10-19T01:26:41+5:302016-10-19T01:26:41+5:30
सहा महिन्यांपूर्वी मसाळा गावाला वीज पुवठा सुरळीत व्हावा म्हणून नव्याने रोहित्र बसविण्यात आले;

नवीन रोहित्राला विद्युत जोडणीची प्रतीक्षा
कमी दाबामुळे उपकरणे जळाली : मसाळ्यातील ट्रान्सफॉर्मर ठरतेय शोभेचे
आकोली : सहा महिन्यांपूर्वी मसाळा गावाला वीज पुवठा सुरळीत व्हावा म्हणून नव्याने रोहित्र बसविण्यात आले; पण दीर्घ कालावधी लोटूनही ते कार्यान्वित झाले नाही. यामुळे सदर रोहित्र गावाची शोभा वाढविणारेच ठरत आहे. आजही या रोहित्राला विद्युत जोडणीची प्रतीक्षाच असल्याचे दिसते.
येळाकेळी कार्यालयाच्या मसाळा गावात दोन वेल्डींग वर्कशॉप, वाहन दुरूस्ती सेंटर आणि पीठ गिरणीत भर पडल्याने गावाला कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांमध्ये ओरड आहे. कमी दाबामुळे उपकरणे जळतात. पंखा फिरत नाही. उन्हाळ्यात कुलर तर अजीबात काम करीत नाही. यामुळे नागरिक त्रस्त होते. याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर एप्रिल महिन्यात नवीन रोहित्र बसविण्याकरिता हालचाली सुरू झाल्या.
तत्कालीन कनिष्ठ अभियंता जी.पी. सानप यांनी रोहित्र बसविण्याचे काम पूर्ण केले. त्याला आता सहा महिन्यांचा कालावधी लोटत आहे. रोहित्राचे संपूर्ण काम झाले आहे. केवळ वीज जोडणी देऊन ते कार्यान्वित करणे शिल्लक राहिले आहे; पण महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केल्याचेच दिसून येत आहे. सध्या गावाला कमी दाबाचा वीज पुरवठा होत असून उपकरणे जळण्याच्या घटना कायम आहेत. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत रोहित्र कार्यान्वित करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)