सेवाग्राम : शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन असलेले शेतातील उत्पादन निसर्गाने हिरावले़ आर्थिक विषन्नतेत असलेले शेतकरी शासनाकडे आशेच्या नजरेने पाहत आहे; पण काही घोषणा न शेतकरी चिंताग्रस्त आहे़ सध्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षाच लागल्याचे दिसते़सोयाबीन देशातील पीक नसताना शेतकरी याकडे वळले़ चांगले उत्पन्न मिळू लागल्याने कापसाच्या खालोखाल सोयाबीनचा क्रमांक लागला़ हळूहळू ज्वारीची पेरणी संपली आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला़ सोयाबीन कमी खर्चाचे व तीन महिन्यांच्या कालावधीचे पीक असून भावही चांगले होते़ यामुळे पेरणी क्षेत्र वाढले़ बियाण्यांचा खर्च वाढला़ दुसरीकडे निसर्गाने असहकार पुकारला आणि सोयाबीनमुळे शेतकरी संपुष्टात येणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ असाच काहीसा प्रकार विदर्भाचे पांढरे सोने असलेल्या कापसाबाबत घडत आहे़ कापसाच्या भरवशावर शेतकरी जगला़ नवीन बियाणे आणि पद्धती यासाठी तो वारेमाप खर्च करू लागला; पण पदरात काहीच पडत नसल्याने हतबल झाला आहे़ कधी अति पाऊस तर कधी दुष्काळाने शेतकरी मेटाकुटीस आला़ यंदा रोग, पाणी व लाल्या यामुळे पांढरे सोने एक-दोन वेच्यातच संपुष्टात आले़ ही स्थिती सर्वच ठिकाणी निर्माण झाली आहे़ शेतीसाठी काढलेले कर्ज फेडणे तर दूरच; पण आता जगायचे कसे, हा मुख्य प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़ मजुरीचाही प्रश्न गंभीर होणार आहे़ ग्रामीण भागात सर्वाधिक रोजगार देणारा कापूस होता़ सामान्यपणे मार्च महिन्यापर्यंत कापूस वेचणी चालत होती; पण यंदा वेचणी डिसेंबर अखेरपर्यंत चालणार, असे दिसते़ धरण आहे, कालवे, वितरिका, पानसऱ्या आहे; पण अद्याप हमदापूर, आलगाव, भोसा येथे पाणीच पोहोचत नाही़ गहू, चन्याचे कठाण तयार आहे; पण पाणीच नसल्याने शेतकरी रबीच्या पिकाला मुकणार आहे़ खरीब गेले व रबी हंगामही धोक्यात आल्याने शेतकरी आत्महत्या होत आहे़ शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)
शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा
By admin | Updated: December 9, 2014 22:55 IST