शासकीय इमारतींना ‘अच्छे दिन’ ची प्रतीक्षा

By Admin | Updated: April 21, 2016 02:33 IST2016-04-21T02:33:28+5:302016-04-21T02:33:28+5:30

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या शहराचा व तालुक्याचा विकास होत असल्याचा गवगवा केला जात आहे.

Waiting for government buildings to get good days | शासकीय इमारतींना ‘अच्छे दिन’ ची प्रतीक्षा

शासकीय इमारतींना ‘अच्छे दिन’ ची प्रतीक्षा

घोराड : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या शहराचा व तालुक्याचा विकास होत असल्याचा गवगवा केला जात आहे. पण तीन वर्षांपासून सेलू येथील तहसील व आरोग्य विभागाच्या इमारतीचे बांधकाम अपूर्णावस्थेत आहे. क्रीडा संकुलाची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात आहे. तर तालुका कृषी विभाग व पंचायत समितीच्या जीर्ण इमारतीला अच्छे दिनची प्रतीक्षा कायम आहे.
सेलू गावाला नगराचा दर्जा देत नगर पंचायत अस्तित्वात आली. पण अद्याप ग्रामपंचायतच्या इमारतीतूनच कारभार पहावा लागत आहे. सभापतींना वेगळा कक्ष नाही. सभेसाठी वेगळा हॉल नाही. त्यामुळे नगर पंचायतीची नवीन इमारत कधी होणार याकडे सेलू वासीयांचे लक्ष लागले आहे. जुन्याच इमारतीला नवे नाव नवे रूप देण्यात आले. ज्या खुर्चीवर सरपंच-उपसरपंचाचा नामफलक होता तिथे अध्यक्ष व उपाध्यक्ष हा बदल करण्यात आला.
गत पाच वर्षाअगोदर क्रीडा संकुलाची इमारत बांधून पूर्ण झाली. ही इमारत तालुका क्रीडा अधिकारी आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. कोट्यवधी रूपयांची जागा मैदानासाठी राखीव आहे. असे असले तरी या क्रीडासंकुलातून खेळाडूंना मार्गदर्शन तर दुरच पण या संकुलाचे उद्घाटन होऊन खेळाडूंना खेळ खेळण्यासाठी हे मैदान खुले कधी होणार हा संशोधनाचा विषय आहे. क्रीडा संकुल केव्हा सुरू होणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. परिणामी सुसज्ज इमारत आज शोभेची वास्तू म्हणून उभी असून तिची दुरवस्था व्हायला वेळ लागणार नाही असे बोलल्या जात आहे.
गत तीन वर्षांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे व नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. किरायाच्या इमारतीतून तीन वर्षांपासून तहसील कार्यालयाचा कारभार चालत आहे. पण बांधकामाच्या गती अतिशय मंद असल्याचे दिसत आहे. कंत्राटदारावर कारवाई होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत असल्याचे बोलल्या जात आहे. दोन्ही इमारतीचे बांधकाम अपूर्ण असतानाही बांधकाम विभाग ठोस पावले का उचलत नाही हे देखील न उलगडणारे कोडेच आहे.
त्याचप्रमाणे गत दोन वर्षापासून पंचायत समिती कार्यालयाची इमारत छतावर ताडपत्रीचे पांघरूण घेवून जीर्णावस्थेत उभी आहे. कवेलूही अद्याप बदलविलेले नाही. पण अशाही स्थितीत इमारतीत नुकतेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. गोदामासाठी इमारत किरायाणे घ्यावी लागली आहे. जिर्णावस्थेत असलेल्या खोल्यामधून एकात्मिक बाल विकास, शिक्षण, पशुधन आदी कार्यालयांचे कामकाज चालते.
तसेच तालुका कृषी विभागाला स्वतंत्र मालकीची इमारत नाही. कृषी अन्वेषण विभागाच्या जागेतच फलोद्यान, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांंची कार्यालय आहेत. या इमारतीकडे पाहिल्यानंतर कृषी क्षेत्राचा विकास दृष्टीक्षेपात येतो.
येथील कृषी साहित्य ठेवण्यासाठी असलेल्या गोदामाची दुरवस्था पाहिल्यानंतर तालुक्यातल्या शासकीय इमारतीला गतवैभव प्राप्त होण्यासाठी शासन निधी देतील का हा ही प्रश्न कायम आहे.
तालुक्यात आजतागायत शेतीच्या बांधापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही. कृषी प्रक्रिया उद्योग उभा राहिला नाही. औद्योगिक वसाहत दिवास्वप्न ठरत आहे.(वार्ताहर)

Web Title: Waiting for government buildings to get good days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.