वर्षभरापासून शेतकऱ्यांना चुकाऱ्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: January 11, 2016 02:02 IST2016-01-11T02:02:17+5:302016-01-11T02:02:17+5:30
वर्षभर राबून शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या जिनिंग प्रेसिंग संस्थेला विकला.

वर्षभरापासून शेतकऱ्यांना चुकाऱ्याची प्रतीक्षा
शेतकरी अडचणीत : पैसे देण्यास टाळाटाळ
सेलू : वर्षभर राबून शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या जिनिंग प्रेसिंग संस्थेला विकला. २४ तासात कापसाचा चुकारा देण्याचे निर्देश आहे. तरीही वर्षभराचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना कापसाचा एक रूपयाही व्यापाऱ्याने दिलेला नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.
येथील श्रीकृष्ण जिनिंग, प्रेसिंगच्या मालकाने परिसरातील चारशे शेतकऱ्यांचे कापसाचे सहा कोटी २३ लाख रूपये वर्षभरापासून थकवले आहे. ही रक्कम व्याजासह आठ कोटी रूपयांच्या घरात पोहोचली आहे. शासकीय यंत्रणा कारवाईत दिरंगाई करीत असल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटू लागला आहे. श्रीकृष्ण जिनिंग, प्रेसिंग संस्थेत परिसरातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी कापूस विकला. यातील ४०० च्या जवळपास शेतकऱ्यांना कापसाचा चुकाराच देण्यात आला नाही. शेतकऱ्यांचे तब्बल ६ कोटी २३ लाख रूपये सदर व्यापाऱ्यांकडे थकले आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर प्रशासक तलमले, जिनिंग प्रेसिंगचे मालक सुनील टालाटुले, बाजार समितीचे सचिव सुफी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांनी समुद्रपूरच्या सहायक दुय्यम निंबंधकाकडेही तक्रार केली. न्यायाधीकरणाने यासंदर्भात तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना पैसे परत करण्याचे आदेशही दिले. पण अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना छदामही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असूना ते संताप व्यक्त करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)