कृषी पंपाला वीज जोडणीची प्रतीक्षा
By Admin | Updated: October 16, 2015 03:01 IST2015-10-16T03:01:29+5:302015-10-16T03:01:29+5:30
वर्धा तालुक्यातील इटाळा येथील शेतकऱ्याने ओलिताची सोय व्हावी म्हणून बँकेचे तीन लाख रुपये कर्ज घेऊन विहीर खोदली.

कृषी पंपाला वीज जोडणीची प्रतीक्षा
वर्षभरापूर्वी भरली अनामत : ओलिताअभावी पिकांचे नुकसान
वायगाव (नि.) : वर्धा तालुक्यातील इटाळा येथील शेतकऱ्याने ओलिताची सोय व्हावी म्हणून बँकेचे तीन लाख रुपये कर्ज घेऊन विहीर खोदली. यानंतर वीज जोडणीसाठी अर्ज करीत अनामत रक्कम भरली. यास एक वर्षाचा काळ लोटला; पण अद्याप वीज जोडणी मिळाली नाही. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.
यशवंत कॉलनी वर्धा येथील शेतकरी मनीष तेलरांधे यांचे इटाळा येथे साडे अकरा एकर शेत आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत ते कोरडवाहू शेती करीत होते; पण सतत नुकसान होत असल्याने त्यांनी आयडीबीआय बँकेकडून १२ मे २०१४ रोजी ३ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज घेतले. यात विहिरीचे बांधकाम केले. यानंतर ५ जून २०१४ रोजी महावितरणकडे वीज जोडणीकरिता ५ हजार १०० रुपये अनामत रक्कम भरली. वीज पुरवठा मिळेल, या अपेक्षेने जून २०१४ मध्ये त्यांनी कपाशीची लावण केली; पण मागील हंगामात त्यांना कपाशीला पाणी देता आले नाही. दुसरे पिकही घेता आले नाही. यामुळे त्यांचे नुकसान झाले.
वीज जोडणीसाठी सतत पाठपुरावा केला. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राजेंद्र मुळक, केंद्राचे विद्यमान मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे व खासदार रामदास तडस यांनाही निवेदने दिली; पण अद्याप वीज जोडणी मिळाली नाही. अधिकाऱ्यांकडेही पाठपुरावा केला; पण उपयोग झाला नाही. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या उर्जा मित्रच्या बैठकीला त्यांनी हजर राहुन पाठपुरावा केला. निवीदा निघाल्या नसल्याचे सांगण्यात आले. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत वीज जोडणी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.(वार्ताहर)