शहरातील कचऱ्याने बुजविला जातोय वाघाडी नाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:32 IST2018-02-05T23:31:50+5:302018-02-05T23:32:16+5:30
राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. स्थानिक नगर पंचायत मात्र गावातील वाघाडी नाला बुजवित असल्याचे समोर येत आहे. शहरातील कचरा वाघाडी नाल्यात टाकून नाला बुजविण्याचा अफलातून प्रकार येथे सुरू आहे.

शहरातील कचऱ्याने बुजविला जातोय वाघाडी नाला
आॅनलाईन लोकमत
समुद्रपूर : राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. स्थानिक नगर पंचायत मात्र गावातील वाघाडी नाला बुजवित असल्याचे समोर येत आहे. शहरातील कचरा वाघाडी नाल्यात टाकून नाला बुजविण्याचा अफलातून प्रकार येथे सुरू आहे.
हा नाला बुजल्यास पावसाळ्यात लगतची झोपडपट्टी व परिसरातील शेतात पाणी शिरण्याचा धोका आहे. यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर पंचायतने कचरा डेपो निर्माण करून तेथे शहरातील घनकचरा जमा करणे तथा तेथे सावनेर मॉडेलप्रमाणे गांडुळ खत, बायोगॅस आदी प्रकल्प राबवावे, अशी मागणी गटनेता मधुकर कामडी यांनी केली आहे. नुकताच घनकचऱ्याविषयीचा अभ्यास दौरा सावनेर येथे सर्व नगरसेवक, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी केला; पण यावर कार्यवाही करणे सोडून वाघाडी नाला बुजविला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातून गोळा करण्यात आलेला कचरा वाघाडी नाल्यात टाकला जात आहे. परिणामी, नाल्यातून वाहणारे पाणी दूषित होत असल्याचे दिसते. ते पाणी पिल्यामुळे गुरांमध्ये आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. कधी काळी ओसंडून वाहणारा हा नाला आता कचऱ्याने बुजविला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
पेटत्या कचऱ्यामुळे धोक्याची शक्यता
शहरातून गोळा करण्यात आलेला कचरा सध्या वाघाडी नाल्याच्या पात्रात टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. सदर कचरा त्याच ठिकाणी जाळला जात असल्याने त्या धूरामुळे तथा दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. शिवाय दूषित पाणी पिल्यामुळे गुरांतील आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे.
स्मशानभूमिच्या बाजूला असलेल्या जागेवर कटघरे करून तेथे घनकचरा जमा करण्यात येणार आहे; पण त्याला अद्याप मंजुरी न मिळाल्याने तात्पुरता नाल्यात घनकचरा टाकण्यात येत आहे.
- शीला सोनारे, अध्यक्ष, नगर पंचायत, समुद्रपूर.
गावाची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीच्या पात्रात एकेकाळी गुरांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुबलक साठा राहत होता; पण आता नगर पंचायतीने तेथे कचरा टाकून नदीला प्रदूषित करण्याचे व बुजविण्याचे कार्य अगदी प्रामाणिकपणे हाती घेतले आहे. या बाबीला फाऊंडेशनचा विरोध आहे. नगर पंचायतीने कचऱ्याची विल्हेवाट नियोजीत डम्पिंग ग्राऊंडवर लावणे गरजेचे आहे.
- मंगश भूत, अध्यक्ष, वाघाडी फाऊंडेशन, समुद्रपूर.