वाघाडी नाल्याला पुराचा धोका
By Admin | Updated: June 29, 2015 02:37 IST2015-06-29T02:37:29+5:302015-06-29T02:37:29+5:30
तालुक्यातील लहान आर्वी गावाला लागून असलेल्या वाघाडी नालात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.

वाघाडी नाल्याला पुराचा धोका
आष्टी (शहीद) : तालुक्यातील लहान आर्वी गावाला लागून असलेल्या वाघाडी नालात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे पाणी वाहून जाताना अडथळा निर्माण होऊन पुराचा धोका वाढला आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे.
लहान आर्वी गावाला लागून वाघाडी नाला आहे. सदर नाला गेल्या अनेक वर्षापासून बुजलेला आहे. त्यामुळे या पुलाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच या नाल्यात झाडे-झुडपे व गवतही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पाणी वाहून जाताना अडथळा निर्माण होतो. परिणामी गावांना धोका निर्माण झाला आहे. तसेच या नाल्यावरील पुलाची उंचीही कमी असल्याने पाऊस येताच पुलावरून पाणी वाहिऊ लागते. त्यामुळे या नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण करणे अत्यावश्यक झाले आहे.
खोलीकरणासाठी लहान आर्वीचे सरपंच सुनील साबळे यांनी जिल्हाधिकारी वर्धा आणि तहसीलदार आष्टी यांना निवेदन दिले. परंतु प्रशासनाने साधी मौका पाहणीसद्धा केली नसल्याचे ग्रामस्थ व सरपंच सांगत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या नाल्याला दोन वेळा पूर आला.
नाल्यामध्ये वाहून आलेला कचरा हा पुलाला अटकून पडला आहे. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने सदर गाळ काढणे आवश्यक आहे. या संदर्भात तहसीलदारांसोबत चर्चाही करण्यात आली. यावेळी तुमचे काम होऊन जाईल, असे सांगण्यात आले. परंतु अद्याप काम झालेले नाही. तसेच उपविभागीय अभियंता (सा.बा.वि) यांच्याशी संपर्क केला असता, तुम्ही अंतोरा येथून जेसीबी घेवून या आणि काम करून घ्या, असा मोफतचा सल्ला देण्यात आला. नाल्यावरील पुलाला गाळ अडकल्याने पावसाचे पाणी अडून गावात शिरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच यामुळे मोठे नुकसान होण्याचाही धोका आहे. त्यामुळे यापुढे नाल्याच्या पुराने गावातील नागरिकांचे नुकसान झाल्यास तहसील प्रशासनास जबाबदार धरून ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरपंच सुनिल साबळे व ग्रामस्थांनी दिला आहे.(प्रतिनिधी)