प्रत्येक उमेदवारांना आशा : १७ उमेदवार रिंगणात; पक्षांतर्गत बंडामुळे चुरस वाढलीवर्धा: जिल्ह्यातील सहाही पालिकांच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यातूनच नव्या नगराध्यक्षाची निवड होणार आहे. सहा जागांकरिता होत असलेल्या या निवडणुकीच्या रिंगणात १७ उमेदवार असल्याने चुरस वाढली आहे. उमेदवारी दाखल झाल्याच्या तारखेपासून तर मागे घेण्याच्या तारखेपर्यंत लाखोंची उलाढाल झाल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील वर्धा, सिंदी (रेल्वे), देवळी व आर्वी येथील स्थिती काही प्रमाणात स्पष्ट असली तरी पुलगाव व हिंगणघाट येथे मात्र एका पक्षाचे उमेदवार समोरासमोर आहेत. यामुळे खूर्ची कोणाची हे सांगणे कठीण आहे. नामांकन दाखल करण्याच्या दिवशी अनेकांनी उमेदवारी जाहीर केली. यात सहाही नगर परिषदेत २० जणांचे अर्ज आले होते. हे अर्ज परत घेण्याची अंतीम तारीख सोमवारी होती. सायंकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज परत घेण्याची वेळ असली तरी केवळ पुलगाव येथील अपक्ष उमेदवार प्रमोद घालाणी व सिंदी (रेल्वे) येथील काँग्रेसच्या अंजली उमाटे यांनी माघार निवडणुकीतून माघार घेतली. यापूर्वीच पुलगावच्या संगीता रामटेके यांचा अर्ज रद्दबातल ठरला होता. पुलगावच्या निवडणुकीत तीन काँग्रेस व एक भाजपचा उमेदवार रिंगणात आहे. या कारणाने चुरस वाढली आहे. हीच स्थिती हिंगणघाट येथे आहे. येथे चार राष्ट्रवादी काँग्रेसचे तर एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या कारणाने येथील गणित स्पष्ट नसल्याचे चित्र आहे. आर्वी येथे काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत आहे. येथे आलेले दोनही अर्ज कायम आहेत. यामुळे येथे नगराध्यक्षपद कुणाच्या वाट्याला येते ते येथील आजी व माजी आमदाराने केलेल्या मोर्चेबांधणीवर अवलंबून आहे. यात कोण बाजी मारेल हे मंगळवारीच समोर येईल. सिंदी रेल्वे येथेही काँग्रेस व भाजप समोरासमोर असून येथे अपक्ष उमेदवारावर नगगराध्यक्षाची भिस्त आहे. वर्धेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस समोरासमोर आहे. येथे भाजप व राष्ट्रवादीची अभद्र युती यावेळीही कायम राहण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नगराध्यक्षाची खुर्ची राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल, अशी चर्चा आहे. देवळीची स्थिती वेगळी आहे. येथे एकच अर्ज असल्याने निवडणूक अविरोध होणार आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
नगराध्यक्षपदांसाठी आज मतदान
By admin | Updated: July 21, 2014 23:59 IST