सायंकाळी गर्दी वाढल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान
By Admin | Updated: February 17, 2017 02:14 IST2017-02-17T02:14:13+5:302017-02-17T02:14:13+5:30
तालुक्यात जि.प. च्या सात गट तर पं.स.च्या १४ गणासाठी सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ झाला.

सायंकाळी गर्दी वाढल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान
हिंगणघाट : तालुक्यात जि.प. च्या सात गट तर पं.स.च्या १४ गणासाठी सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ झाला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत तालुक्यात ४९.९७ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली. शेवटच्या टप्प्यात मतदारांची गर्दी वाढल्याने रात्री ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरूच होती.
वडनेर नजीकच्या गंगापूर, टेंभा, पोहणा या गावांत मतदान केंद्रावरील गर्दी हाताळण्यासाठी अतिरक्त पोलीस कुमक पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरूवात झाली. पहिल्या चार तासांत मतदानाची टक्केवारी ११ टक्के होती. नंतर ११.३० वाजेपर्यंत मात्र मतदानात वाढ होऊन १.३० वाजता ३३.२० टक्के मतदान झाले तर ३.३० वाजता ४९.९७ टक्के मतदानाची नोंद प्रशासनाने घेतली. यावेळी एकूण १ लाख ४५८ पैकी २४ हजार ९४ पुरूष व २५ हजार ३०० स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे तहसीलदार सचिव यादव यांनी सांगितले. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांची प्रचंड गर्दी झाली. परिणामी, काही मतदान केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालेल, असा अंदाज वर्तविला जात होता. यामुळे मतदानाची निश्चित टक्केवारी रात्री उशिरा मिळणार आहे. असे असले तरी ७० टक्केपर्यंत मतदान होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला. सर्व गावातील मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. हिंगणघाट, वडनेर, अल्लीपूर पोलिसांत एकाही घटनेची नोंद नव्हती.(तालुका प्रतिनिधी)