मतदार याद्यांचे होणार शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण

By Admin | Updated: June 22, 2015 01:54 IST2015-06-22T01:54:10+5:302015-06-22T01:54:10+5:30

भारत निवडणूक आयोगाद्वारे मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि प्रमाणिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Voters will have purification and certification | मतदार याद्यांचे होणार शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण

मतदार याद्यांचे होणार शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण

भारत निवडणूक आयोगाचा निर्णय : चारही मतदार संघांत कार्यक्रमास प्रारंभ
वर्धा : भारत निवडणूक आयोगाद्वारे मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि प्रमाणिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तत्सम कार्यक्रम राबविला जात आहे. चारही विधानसभा मतदार संघामध्ये १ एप्रिलपासून संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांद्वारे हे काम सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशुतोष सलील यांनी सांगितले.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व भारत निवडणूक आयोग यांनी संंपूर्ण देशात प्रत्येक महिन्याचे एका रविवारी विशेष मोहीम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जून महिन्यात २१ जूनऐवजी २८ जून रोजी व जुलै महिन्यात १२ जुलै या दिवशी प्रत्येक मतदार संघात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष मोहिमेच्या दिवशी बुथ लेव्हल अधिकारी संबंधित मतदार केंद्रांवर उपस्थित राहून आधार कार्ड, ई-मेल, मोबाईल क्रमांक संकलीत करून सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करणार आहेत. मतदारांची छायाचित्रे, मतदार ओळखपत्रातील माहिती व युआयडीएआयची आधार कार्डमधील माहिती यांची सांगड घालणे, मतदार यादीतील दुबार, मयत व स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे, मतदार छायाचित्र ओळखपत्रातील चुका दुरूस्त करून प्रमाणित मतदार याद्या तयार करणे, हा मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा या चारही विधानसभा मतदारसंघात १ एप्रिलपासून या कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे. राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण, प्रमाणिकरण कार्यक्रमात १ एप्रिल ते दिनांक ८ जूनपर्यंत चारही मतदार संघामध्ये झालेल्या कामांची माहितीही प्रपत्रात सादर करण्यात आली आहे. यामुळे आता मतदार याद्या अद्यावत होतील, असे संकेत मिळू लागले आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Voters will have purification and certification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.