मंडप नसल्याने मतदारांना सोसावे लागले उन्हाचे चटके
By Admin | Updated: February 17, 2017 02:12 IST2017-02-17T02:12:23+5:302017-02-17T02:12:23+5:30
तालुक्यातील जि.प. च्या सहा आणि पं.स. च्या १२ जागांसाठी गुरूवारी मतदान पार पडले. दुपारी १२ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर विशेष गर्दी नव्हती;

मंडप नसल्याने मतदारांना सोसावे लागले उन्हाचे चटके
रात्री ९ वाजेपर्यंत चालली मतदान प्रक्रिया
सेलू : तालुक्यातील जि.प. च्या सहा आणि पं.स. च्या १२ जागांसाठी गुरूवारी मतदान पार पडले. दुपारी १२ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर विशेष गर्दी नव्हती; पण १२ ते २ वाजेपर्यंत मतदारांची गर्दी वाढली. २.३० ते मतदान प्रक्रिया बंद होईपर्यंत केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मंडपाची व्यवस्था नसल्याने मतदारांना चटके सोसावे लागले.
प्रतिष्ठेच्या हिंगणी जि.प. गटात माजी जि.प. अध्यक्ष काँग्रेसचे विजय जयस्वाल व भाजपचे विद्यमान जि.प. सदस्य राणा (विरेंद्र) रणनवरे यांच्यात लढतीची रंगत मतदारांनी अनुभवली. या मतदान केंद्रावर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण शक्ती पणाला लावली होती. झडशी गटात झडशीचे विद्यमान सरपंच काँग्रेसचे उमेदवार विवेक हळदे, भाजपाचे वरुण दप्तरी यांच्यातील लक्षवेधी लढतीमुळे चुरस होती. केळझर जि.प. गटात काँग्रेसचे संदीप वाणी, भाजपाचे विनोद लाखे, राष्ट्रवादीचे मिलिंद हिवलेकर, शिवसेनेचे रवींद्र चव्हाण, अपक्ष फारूख शेख व अरुण उरकांदे या तुल्यबळ उमेदवारांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येळाकेळी जि.प. गटात काँग्रेसच्या मनीषा वैरागडे, भाजपच्या सोनाली अशोक कलोडे यांच्यातील लढतीत अपक्ष मंजूळा दुधबडे यांनी रंगत आणली.
तालुक्यात काही मतदान केंद्राच्या परिसरातच पक्षांनी बुथ लावले असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठलाही आक्षेप घेतला नसल्याचे पाहावयास मिळाले. मतदान केंद्राच्या दारापर्यंत काही ठिकाणी कार्यकर्ते मतदारांना चिन्ह सांगताना दिसत होते. गावात मतदानाच्या चिठ्ठ्या वाटणाऱ्या काही ग्रामसेवकांनी जवळीक असलेल्या उमेदवाराचा चिठ्ठ्या वाटताना प्रचार केल्याचे अनेकांना दिसल्याची काही केंद्रांवर चर्चा होती. मतदारांत विशेष उत्साह नव्हता. काही उमेदवारांनी काही गावच्या नेत्यांना प्रलोभने दिल्याची चर्चा असल्याने गाव नेते मैदानात दिसले नाहीत. अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले.(तालुका प्रतिनिधी)