प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करा
By Admin | Updated: September 27, 2014 23:20 IST2014-09-27T23:20:24+5:302014-09-27T23:20:24+5:30
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता लोकशाही मार्गाने मतदान करण्याची शपथ मतदार जागृती अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी विद्यार्थ्यांनी घेतली.

प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करा
वर्धा : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता लोकशाही मार्गाने मतदान करण्याची शपथ मतदार जागृती अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी विद्यार्थ्यांनी घेतली.
लोक महा़च्या सभागृहात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार दि. १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदानामध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, यासाठी मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे़ या अभियानाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष गजानन कोटेवार होते तर अतिथी म्हणून वर्धा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, निवडणूक उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, प्राचार्य डॉ. पुष्पा तायडे आदी उपस्थित होते. मतदार जागृती अभियानांतर्गत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासोबतच महिलांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे़ वर्धा विधानसभा मतदारसंघात प्रथमच व्हिव्हीपॅटचा वापर होत आहे़ मतदारांना मतदान केल्यानंतर आपण केलेले मतदान योग्य असल्याची खात्री व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
मतदानाची किंमत ठरवू नका, कारण आपण निवडून दिलेला उमेदवार विधानसभेमध्ये पाच वर्षांसाठी आपले प्रतिनिधीत्व करणार आहे. यामुळे युवकांनी समाजामध्ये मुक्त व नि:पक्षपाती तसेच निर्भयपणे मतदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी मान्यवरांद्वारे करण्यात आले.
मतदारांना जागृत करण्याची जबाबदारी युवकांची आहे़ १८ वर्षे झाल्यानंतर प्रत्येक युवकाने मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजावावा तसेच आपल्या कुटुंबातील कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी केले़
लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष गजानन कोटेवार यांनी मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक व कर्मचारी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सकाळी ७ वाजता मतदान केंद्रावर घेऊन जाण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, प्राथमिकचे रवींद्र काटोलकर यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी विद्यार्थ्यांना मतदान करण्यासाठी तसेच मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी शपथ दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पुष्पा तायडे यांनी केले तर आभार प्रा. सोनुलकर यांनी मानले. मतदार जागृती अभियानाच्या रॅलीचा प्रारंभ हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला़ यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मतदार जागृती अभियान राबविण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाला चित्रकार, पराडकर तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)