महाअवयवदान अभियानात स्वेच्छा सहभाग घ्यावा
By Admin | Updated: September 1, 2016 02:11 IST2016-09-01T02:11:36+5:302016-09-01T02:11:36+5:30
अवयवाचा प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवसंजिवनी देण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न आहे. नागरिकांनी अभियानात

महाअवयवदान अभियानात स्वेच्छा सहभाग घ्यावा
शैलेश नवाल : जनजागृती रॅलीने प्रारंभ, विद्यार्थ्यांचा सहभाग
वर्धा : अवयवाचा प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवसंजिवनी देण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न आहे. नागरिकांनी अभियानात स्वेच्छा सहभाग घेत अवयवदान करीत गरजू रुग्णांना मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विभागीय प्रत्यारोपणन समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान राज्यभर महा अवयवदान अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा शुभारंभ बुधवारी जनजागृती रॅलीने करण्यात आला. बुधवारी सकाळी ७.३० वाजता सामान्य रुग्णालयात खा. रामदास तडस यांनी अवयवदान नोंदणी व जनसंपर्क कक्षाचे उद्घाटन केले. रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. रॅलीच्या समारोप कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.बी. राठोड, डॉ. अनुपम हिवलेकर, हिवताप अधिकारी धाकटे, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, रोटरी क्लबच्या अध्यक्ष सुनीता इथापे, महाअवयवदान समन्वयक पी. एस. काकडे उपस्थित होते. रॅली सामान्य रुग्णालय, बजाज चौक, बढे चौक, मार्केट लाईन, महादेवपूरा ते पुन्हा रुग्णालयात रॅलीचा समारोप झाला. रॅलीत ११ महा.तील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत जनजागृती केली.
पोलीस अधीक्षक गोयल यांनी तरुणांनी अवयवदानाची नोंदणी करावी. याबाबत सामान्यांत नागरिकांत जनजागृती करावी, असे आवाहन केले. डॉ. जुनेद शेख यांनी कोणते अवयव दान करता येतात व कायद्यानुसार वैधतेची माहिती दिली. डॉ. मडावी यांनी प्रास्ताविकात अवयवदानाची संकल्पना देशात राबविली जात असून तीन दिवस महाविद्यालयांत जनजागृती केली जाणार असल्याचे सांगितले. अवयव दानांतर्गत हृदय, मुत्रपिंड, किडणी, यकृत, फुफ्फुस, डोळे, त्वचा, प्लीहा यासारख्या अवयवाचे दान करता येते, अस सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)