विनोबा भावे उड्डाणपूल धोकादायक वळणावर
By Admin | Updated: May 22, 2014 01:25 IST2014-05-22T01:25:22+5:302014-05-22T01:25:22+5:30
स्थानिक बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
विनोबा भावे उड्डाणपूल धोकादायक वळणावर
वर्धा : स्थानिक बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाणपुलाची दुरवस्था पाहता त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. अतिमहत्त्वाच्या या उड्डाणपुलावर सध्या हजारावर खड्डे पडले आहेत. यवतमाळ तसेच हिंगणघाटकडे दिवसाला हजारो वाहने याच पुलावरून धावत असतात. नागरिकांचीही मोठी वर्दळ असते. पुलावर असंख्य खड्डे पडलेले असल्याने नागरिकांना येथून मार्गक्रमण करताना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागतो. पूल नुतनीकरण प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे मागील अनेक वर्षांपासून पडलेला आहे. त्यामुळे पुलाची तात्पुरती दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुलाची दुरवस्था झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होणे नित्याची बाब झाली आहे. बहुतांश वेळा शहरातील बजाज चौकात वाहतूक विस्कळीत झाल्यास दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना तासन्तास पुलावरच अडकून पडावे लागते. पुलावरील खड्डय़ांमुळे अपघाताच्या किरकोळ घटनाही दररोज घडत असल्याचे दिसून येते. कृषी उत्पन्न बाजार समितीही पुलाखालीच असल्याने शेतकर्यांना आपल्या मालाची ने-आण येथूनच करावी लागते. या पुलाची जीर्ण अवस्था झालेली असल्याने पूल कधी कोसळेल याचा नेम राहिलेला नाही. यात मोठी जीवितहानी होण्याचा धोका आहे. या पुलाचे विस्तारीकरण मंजूर झाल्याची माहिती होती; पण ते कामही मोजणीनंतर रखडल्याचेच दिसून येत आहे. प्रचंड वाहतुकीमुळे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. नुकताच बजाज चौकातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले; पण पुलावर अस्तरीकरण करण्याचे सौजन्य कुणी दाखविले नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(स्थानिक प्रतिनिधी)