तळेगावात वाहताहेत गावठी, देशी, विदेशी दारूचे पाट
By Admin | Updated: November 27, 2014 23:39 IST2014-11-27T23:39:35+5:302014-11-27T23:39:35+5:30
परिसरात मोठ्या प्रमाणात बनावट देशी तसेच हातभट्टीची गावठी दारू विकली जात आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने दारूविक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे़

तळेगावात वाहताहेत गावठी, देशी, विदेशी दारूचे पाट
तळेगाव (श्या.पं.) : परिसरात मोठ्या प्रमाणात बनावट देशी तसेच हातभट्टीची गावठी दारू विकली जात आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने दारूविक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे़ वाढत्या दारूविक्रीमुळे गावातील शांतता मात्र भंग होत आहे़ याकडे लक्ष देत दारूविक्रीवर आळा घालावा, अशी मागणी होत आहे़
गावात नवीन पोलीस स्टेशन स्थापन झाले; पण ते नावापूरते असल्याचे दिसते़ गावात २४ तास दारूच्या पुरवठ्याची सेवा उपलब्ध आहे़ दारूबंदी असलेल्या गांधी जिल्ह्यात इथल्याप्रमाणे मोबाईल वर दारू ही सेवा आर्वी मतदार संघात कुठेही दिसून येत नाही. अमरावती जिल्ह्यात ड्राय डे च्या दिवशी दारू मिळत नाही़ यामुळे तिवसा जि़ अमरावती परिसरातील मद्यपि मुबलक दारू मिळत व बिअरबारप्रमाणे व्यवस्था असल्याने गावात येतात. या परिसरात सुमारे २० ते २५ गावठी दारूचे व्यवसाय आहेत़ ५ ते ७ बनावट देशी दारू व विदेशी दारूचे व्यवसाय आहेत़
अनेक जण राष्ट्रीय महामार्गावर धाब्याच्या साह्याने व मोबाईलवर फोन करताच दारू उपलब्ध करून देतात़ काही वॉर्डात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे. पोलीस ठाण्यात यातील अनेक दारूविक्रेत्यांचे रेकॉर्ड आहे. अनेकांवर न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत. यामुळे या अवैध दारू व्यवसायात कुणाचा समावेश आहे, हे पोलिसांना वेगळे सांगण्याची गरज नाही. अनेक जण कित्येक पिढ्यांपासून अवैध दारूविक्रीच्या व्यवसायात गुंतले आहेत़ बस स्थानक चौकात, पानटपरी, ढाबा, कॅन्टीन व काही घरी दारूचा व्यवसाय सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे लहान मुलांनाही दारू कुठे मिळते, हे माहिती असताना पोलीस अनभिज्ञ असावे, ही बाब रूचणारी नाही. सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे मद्यपिंची संख्या वाढली आहे.
अनेकांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत आहे. २०१० ते १४ पर्यंत बनावट देशी-विदेशी व हातभट्टीच्या दारूमुळे ४० जणांचा बळी गेला आहे, अनेकांना दारूच्या अतिव्यसनामुळे जीवघेणे आजार जडलेत़ यामुळे पोलिसांनी दारूविक्रेत्यांविरूद्ध मोहीम उघडून गावातून दारू पूर्णपणे हद्दपार करणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)