युवकांच्या श्रमदानातून गाव झाले स्वच्छ
By Admin | Updated: December 14, 2015 02:01 IST2015-12-14T02:01:26+5:302015-12-14T02:01:26+5:30
शहर, गावांचे सौंदर्य अबाधित राखणे, गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे, ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांसह ग्रामस्थांचीही असते.

युवकांच्या श्रमदानातून गाव झाले स्वच्छ
धाम नदीचे पात्रही टाकतेय कात : खरांगणा (मो.) येथील युवकांसह ग्रामस्थांचा पुढाकार
वर्धा : शहर, गावांचे सौंदर्य अबाधित राखणे, गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे, ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांसह ग्रामस्थांचीही असते. नागरिक हे भान ठेवत नसल्याने आणि संपूर्ण दोष ग्रामपंचायतीवर देत असल्याने अनेक गावे अस्वच्छतेच्या कवेत दिसून येतात; पण संत काळे महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून खरांगणा (मो.) येथील युवक व ग्रामस्थांनी पुढाकार घेत स्वच्छता अभियान राबविले. यामुळे संपूर्ण गाव स्वच्छ झाले असून गावातील धाम नदीचे पात्रही कात टाकताना दिसते.
गावात अस्वच्छता असल्याने व पुढे पुण्यतिथी उत्सव असल्याने विद्यार्थ्यांसह युवकांनी पुढाकार घेत गावात स्वच्छता अभियान राबविले. मुख्य रस्त्यासह संपूर्ण परिसराची सफाई करण्यात आली. यामुळे गावाचा परिसर चकाचक होण्यास मदत झाली. संत काळे महाराज पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम राबवून युवकांनी गाव सुंदर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. खरांगणा (मो.) गावातून धाम नदी वाहते. या नदीवर असलेला पूल ओलांडून गावात जावे लागते. नदीच्या अलीकडे बाजार, दुकाने तर पलिकडे गाव, असा प्रकार आहे. ग्रा.पं. प्रशासनाकडून वेळोवेळी स्वच्छता केली जात असली तरी ते कायम राखण्यात यश मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊनच गावातील विद्यार्थी व युवकांनी पुढाकार घेत ग्रामस्वच्छता अभियान राबविले. गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अभियानात संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले. कचऱ्याची विल्हेवाट लावत नदीच्या पात्रालगतचा परिसरही स्वच्छ करण्यात येत आहे. विद्यार्थी, युवकांचा पुढाकार लक्षात घेत अनेक नागरिकही मदतीकरिता सरसावले आहेत.
दरवर्षी संत काळे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा होता. यात विविध उपक्रम राबविले जातात. यंदा शताब्दी महोत्सव असल्याने गाव स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात स्वावलंबी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, युवक, संत काळे महाराज विश्वस्त समितीचे सदस्य यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. अभियानांतर्गत झेंडा चौकाचा परिसर साफ करण्यात आला. मुख्य रस्त्याची सफाई करून वाढलेली झुडपेही कापली गेली. रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडपांमुळे ये-जा करताना अडचणी निर्माण होत होत्या. ती झुडपे काढून सफाई करण्यात आली. शिवाय मुख्य रस्त्यालगत असलेला केरकचराही काढून कचरा न टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या.(कार्यालय प्रतिनिधी)