ग्रामसेवक आंदोलनावर ठाम
By Admin | Updated: March 4, 2016 02:11 IST2016-03-04T02:11:30+5:302016-03-04T02:11:30+5:30
ग्रामसेवक संघटनेने पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन १७ दिवस लोटूनही तोडगा न निघाल्याने कायमच आहे.

ग्रामसेवक आंदोलनावर ठाम
चर्चेचे गुऱ्हाड सुरुच : ग्रामपंचायतींची कामे ठप्प
वर्धा : ग्रामसेवक संघटनेने पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन १७ दिवस लोटूनही तोडगा न निघाल्याने कायमच आहे.
सावंगी(मेघे) येथील ग्रामसेवक व सरपंचावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे. तसेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा यांची बदली करावी, या मुख्य मागण्यांना घेऊन ग्रामसेवक संघटनेने १५ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढून आंदोलनाचा बिगुल फुंकला. १६ फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. तेव्हापासून ग्रामपंचायतींचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकूणच ग्रामविकासाला खीळ बसली आहे. स्थानिक पातळीवर कोणताही तोडगा न निघाल्याने दोन दिवसांपूर्वी ग्रामसेवक संघटनेचे शिष्टमंडळ मुंबईला गेले होते. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन आंदोलनाची भूमिका पटवून दिली होती. यानंतरही तोडगा न निघाल्याने ग्रामसेवकांनी आंदोलन सुरुच ठेवले. जि.प. व जिल्हा प्रशासनासोबत चर्चेचे गुऱ्हाड सुरूच आहे, अशी माहिती ग्रामसंघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.(जिल्हा प्रतिनिधी)
तीन पदाधिकाऱ्यांनी हकालपट्टी
ग्रामसेवक संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष मनोहर चांदूरकर, जिल्हा सरचिटणीस प्रमोद बिडवाईक व उपाध्यक्ष अंगद सुरकार यांनी संघटनेच्या अन्य पदाधिकारी व आंदोलनकर्त्या सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर सीईओ संजय मीणा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांची भेट घेऊन आंदोलन परत घेण्याचे पत्र दिले. ही बाब महिती होताच आंदोलनकर्त्यांनी या तिघांना संघटनेतून हकालपट्टी करण्याची भूमिका घेतली. त्यांना संघटनेतून काढल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष कुंदन वाघमारे यांनी ‘लोकमत’ला दिली.