दक्षता समितीच अदक्ष
By Admin | Updated: December 24, 2014 23:03 IST2014-12-24T23:03:33+5:302014-12-24T23:03:33+5:30
दलित अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हास्थळावर शासनाच्या निर्देशाने दक्षता समिती गठित करण्यात आली. या समितीच्या वर्धेत एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांत केवळ दोनदाच सभा झाल्या.

दक्षता समितीच अदक्ष
जिल्ह्यात दोनच बैठका : आयुक्तांनी मागविला अहवाल
श्रेया केने - वर्धा
दलित अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हास्थळावर शासनाच्या निर्देशाने दक्षता समिती गठित करण्यात आली. या समितीच्या वर्धेत एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांत केवळ दोनदाच सभा झाल्या. यामुळे ही समिती किती दक्ष आहे हे दिसून येते.
जिल्ह्याच्या समितीने यंदाच्या वर्षात केवळ दोन सभा घेतल्याचे दक्षता व नियंत्रण समितीच्या नागपूर येथे झालेल्या विभागीय बैठकीत उघड झाले. यामुळे विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात अहवाल मागविल्याची माहिती आहे.
नोव्हेंबर महिन्यात नागपूर येथे व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीच्या अहवालानुसार वर्धा या दलित अत्याचाराला प्रतिबंध लावण्यात ‘मागास’ असल्याचे समोर आले.
विभागात नागपूर जिल्ह्याने सहा, चंद्रपूर व गोंदिया पाच, गडचिरोलीने सात सभा घेतल्या आहेत. नागपूर विभागात ८५ टक्के गुन्हे तपासात आहेत. वर्धा जिल्ह्यात १९८९ ते आॅक्टोबर २०१४ पासून ८०२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. यापैकी पोलीस तपासात १४ प्रकरणे आहेत. न्यायप्रविष्ट केलेल्या ७४९ पैकी ६७० प्रकरणांचा निकाल लागला, तर याप्रकरणी ६४ जणांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.