विदर्भ राज्यासाठी ‘विदर्भमुक्ती मार्च’
By Admin | Updated: April 27, 2016 02:17 IST2016-04-27T02:17:44+5:302016-04-27T02:17:44+5:30
महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या बऱ्याच काळात विदर्भावर अन्याय, अत्याचार झाले. शेतकरी आत्महत्याचे वाढते प्रमाण विकासाचा अनुशेष, ...

विदर्भ राज्यासाठी ‘विदर्भमुक्ती मार्च’
जोगेंद्र कवाडे : वैदर्भीयांचा अपमान खपवून घेणार नाही
पुलगाव : महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या बऱ्याच काळात विदर्भावर अन्याय, अत्याचार झाले. शेतकरी आत्महत्याचे वाढते प्रमाण विकासाचा अनुशेष, पाण्याची टंचाई, रोजगाराचा अभाव असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने वेगळे विदर्भ राज्य होणे गरजेचे आहे. वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीसाठी तेलंगणाच्या धर्तीवर आंदोलन होणे आवश्यक असून आपण विदर्भवादी मंडळींना सोबत घेवून, आमगाव ते खामगाव असा विदर्भ मुक्ती मार्च काढणार असल्याचा निर्धार पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केला.
‘विकासाच्या संदर्भात आवश्यक त्याबाबींनी परिपूर्ण असा हा विदर्भ असून एकेकाळी प्रांत वऱ्हाड अन् आहे सोन्याची कुऱ्हाड’ असे या विदर्भाला म्हटल्या जात होते; परंतु काही मंडळींनी विदर्भाकडे पाठ फिरविली. त्यामुळे विकासाचा अनुशेष राहिला. विदर्भातला माणूस आळशी आहे, असे म्हणून काहींनी आमची चेष्टा केली. हा वैदर्भियांचा अपमान आपण कदापी खपवून घेणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले.
पुलगाव भूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झाली असून विदर्भराज्य निर्मिती चळवळीत या शहराचे महत्त्वाचे योगदान आहे. म्हणून विदर्भमुक्ती आंदोलनाचे रणशिंग पुलगावातून फुंकले जाईल, असे आ. कवाडे यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ वा आगमनदिन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते पुलगावात आले. त्यावेळी ते बोलत होते.
स्थानिक बुद्ध विद्या विहारात सोमवरी संपन्न झालेल्या आगमनदिन कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. प्रेम भिमटे होते. याप्रसंगी प्रबोधनकार प्रवीण कांबळे व संच यांनी भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमापूर्वी आ. कवाडे यांनी नगर परिषद प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले तर येथून प्रमुख अतिथीसह कार्यकर्त्यांनी अभिवादन रॅली काढली. या कार्यक्रमास विहार समिती पदाधिकाऱ्यासह मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)