पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांमधून विदर्भ बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:00:19+5:30
विदर्भातील कौंडण्यपूर येथील रुख्मिनी माता यांची पालखी पंढरपूरला दाखल झाली नाही तर पांडुरंगाचे दर्शन सुद्धा अपूर्ण मानावे लागेल, असा वारकऱ्यांच्या भावना आहेत. दरवर्षी पौर्णिमेला रुख्मिनी मातेची पालखी पांडुरंगाच्या मंदिरात नेली जाते. तेथे भगवंतातर्फे आई रुख्मिनी मातेला साडीचोळी देवून बोळवन केली जाते. त्यानंतर रुख्मिनी मातेच्या पादुका भगवंताच्या चरणाजवळ नेतात. तेथेच पाडुरंगाचे दर्शन घेतले जाते.

पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांमधून विदर्भ बाद
प्रमोद भोजने।
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे यावर्षी पंढरपुरला जाणारा पायदळ दिंडी सोहळा रद्द करण्यात आला. मानाच्या सहा पालख्यांमधील पादुका व काही वारकऱ्यांना हेलीकॉप्टर, विमान किंवा वाहनाने पंढरपुरला नेण्याची शासनाने सहमती दर्शविली आहे. या निर्णयामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहेत.परंतु, या सहा पालख्यांमध्ये विदर्भातील एकाही पालखीचा समावेश नसल्याने विदर्भातील वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
विदर्भातील कौंडण्यपूर येथील रुख्मिनी माता यांची पालखी पंढरपूरला दाखल झाली नाही तर पांडुरंगाचे दर्शन सुद्धा अपूर्ण मानावे लागेल, असा वारकऱ्यांच्या भावना आहेत. दरवर्षी पौर्णिमेला रुख्मिनी मातेची पालखी पांडुरंगाच्या मंदिरात नेली जाते. तेथे भगवंतातर्फे आई रुख्मिनी मातेला साडीचोळी देवून बोळवन केली जाते. त्यानंतर रुख्मिनी मातेच्या पादुका भगवंताच्या चरणाजवळ नेतात. तेथेच पाडुरंगाचे दर्शन घेतले जाते. त्याचप्रमाणे रुख्मिनी माता संस्थान कौंडन्यपूर मठ, पंढरपूर येथील मठातून दररोज पांडुरंगाला नैवद्य सुद्धा दिला जातो. ही परंपरा गेल्या ४२५ वर्षापासून सुरु आहेत. मात्र, या परंपरेला यावर्षी कोरोनामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. यासोबतच विदर्भातील संत श्री गुलाबराव महाराज (माधान) भक्तिधाम चांदूरबाजार, संत भास्कर महाराज संस्थान, व संत वासुदेव महाराज संस्थान आकोट, संत शिवराम महाराज संस्थान, वरुड (जळका) येथीलही पालख्या दरवर्षी पंढरपुरला जात असतात. त्याचा शासनाने कुठेही उल्लेख केला नसल्याने या पाखल्यांची शेकडो वर्षाची परंपरा खंडीत न करता याही पालख्यांना पांडुरंगाच्या चरणी माथा टेकण्याची संधी द्यावी, अशी मागणी विदर्भातील वारकऱ्यांकडून केली जात आहे.
शेकडो वर्षाच्या परंपरेचा विचार व्हावा
शासनाने विदर्भातील वारकऱ्यांची शकडो वर्षांची परंपरा लक्षात घेता विदर्भातील रुख्मिनी माता संस्थान कौडन्यपूर, संत श्री गुलाबराव महाराज भक्तीधाम चांदुरबाजार, संत भास्कर महाराज संस्थान व संत वासुदेव महाराज संस्थान आकोट आणि संत शिवराम महाराज संस्थान वरुड (जळका) या पाच पालख्यांचा पंढरपुरला जाण्याची परवानगी द्यावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन फक्त २५ वारकरी वारी पूर्ण करतील. शासनाने जर परवानगी दिली नाही तर विदर्भातील वारकरी पाच पालख्यांमधील पादुका स्वत: च्या वाहनाने पंढरपुरला आणतील, असा इशारा युवा विश्व वारकरी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांना साकडे
विदर्भातील वारकऱ्यांच्या भावनांचा विचार करुन विदर्भातील पालख्यांना परवानगी द्यावी, याकरिता युवा विश्व वारकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह गणेश महाराज शेटे, श्याम महाराज चौबे, मोहन महाराज मेतकर, राम महाराज गव्हारे, पुरुषोत्तम महाराज रौराळे, दिलीप खताळे, प्रकाश दिवे, दिवाकर किटे, मनोहर महाराज कायटे या वारकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री यशोमती ठाकूर, ना.बच्चू कडू, पंढरपुरचे आमदार नाना भाळके, सोलापूरचे जिल्हाधिकारी व अमरावतीे विभागीय आयुक्त यांना निवेदनातून साकडे घातले आहेत.