विदर्भाने सहकाराच्या घोटाळ्याचा आदर्श निर्माण केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:13 IST2018-02-22T22:12:50+5:302018-02-22T22:13:05+5:30
विदर्भातील सहकार क्षेत्रातील बँका, साखर कारखाने, शिक्षण संस्था, सूतगिरणी यांनी सहकार क्षेत्रात घोटाळ्याचा आदर्श निर्माण केला. यापूर्वीच्या सरकारने लोकांना अज्ञानात ठेऊन त्यांच्या गरिबीचा व मजबुरीचा फायदा घेऊन स्वत:च्या तुंबड्या भरून घेतल्या, .....

विदर्भाने सहकाराच्या घोटाळ्याचा आदर्श निर्माण केला
ऑनलाईन लोकमत
हिंगणघाट : विदर्भातील सहकार क्षेत्रातील बँका, साखर कारखाने, शिक्षण संस्था, सूतगिरणी यांनी सहकार क्षेत्रात घोटाळ्याचा आदर्श निर्माण केला. यापूर्वीच्या सरकारने लोकांना अज्ञानात ठेऊन त्यांच्या गरिबीचा व मजबुरीचा फायदा घेऊन स्वत:च्या तुंबड्या भरून घेतल्या, असा घणाघाती आरोप राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केला.
गुरूवारी दुपारी ३ वाजता डॉ आंबेडकर चौकात नगर परिषदेद्वारे आयोजित भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन ना. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस तर अतिथी म्हणून आ.डॉ. पंकज भोयर, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, न.प. अध्यक्ष प्रेम बसंतानी, पं.स. सभापती गंगाधर कोल्हे, सिंदी (रेल्वे) चे अध्यक्ष संगीता शेंडे, समुद्रपूरच्या शिला सोनारे व मान्यवर उपस्थित होते.
ना. देशमुख पूढे म्हणाले की, शेवटच्या घटकाला समाज प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकार काम करीत आहे. गोरगरीब जनतेला सरकारी योजनांचा फायदा मिळाला पाहिजे. सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आज आपल्या सर्वांचा वनवास खऱ्या अर्थाने संपला आहे. केंद्र, राज्य, जि.प., पं.स., नगर परिषद आदी सर्वच क्षेत्र आपण काबीज केले आहे. त्यामुळे न.प. पदाधिकाऱ्यांनी जनतेला अपेक्षित मुबलक पाणी, गटार योजना, कचरा व्यवस्थापन व मूलभूत सुविधा देण्यासाठी काम केले पाहिजे.
खा. तडस, आ.डॉ. भोयर यांनी वर्धा जिल्हा को-आॅ. बँकेच्या घोटाळ्याचा उल्लेख करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. बसंतानी यांनी शासनाकडून शहर विकासासाठी प्राप्त निधी व भविष्यात होणाऱ्या कामांची माहिती दिली. नितीन मडावी यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन संजय मानकर व राकेश शर्मा यांनी केले तर आभार चंद्रकांत घुसे यांनी मानले. यावेळी केशव दांडेकर, डॉ. उषा थूटे, वसंत आंबटकर, भूपेंद्र शहाणे, अनिल जोशी, रमेश टपाले, डॉ तुळसकर आदी उपस्थित होते.